भेंडा | वार्ताहर
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावाचा सुपुत्र आणि प्रो-कबड्डी लीगमधील खेळाडू शंकर भीमराज गदाई याला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने सन २०२३-२४ साठी ‘छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर केला आहे. या पुरस्कारात तीन लाख रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
१५ एप्रिल रोजी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडणार आहे. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.
कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आणि क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे उपस्थित राहणार आहेत.
शंकर गदाई याची जीवनगाथा प्रेरणादायक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तो शेतमजुरी करून दिवसाला फक्त ३०० रुपये कमवत असे. इयत्ता ७ वी पासून कबड्डी खेळायला सुरुवात करणाऱ्या शंकरने आपली मेहनत, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर प्रो-कबड्डी लीगमध्ये स्थान मिळवले.
प्रो-कबड्डी लीगमध्ये त्याने तेलगु टायटन्स आणि गुजरात जायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२३ साली तेलगु टायटन्सने त्याला १५ लाख ६१ हजार रुपयांची बोली लावली होती. तर २०२४ मध्ये गुजरात जायंट्सने तब्बल ३० लाख रुपयांमध्ये त्याची निवड केली. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या शंकरने आपल्या कर्तृत्वाने व्यावसायिक कबड्डी खेळाडू म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
शंकरच्या या यशामुळे भेंडा खुर्द गावासह संपूर्ण नेवासा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशामुळे अनेक ग्रामीण तरुणांना नव्या प्रेरणेसह कबड्डीकडे वळण्याची दिशा मिळणार आहे. शंकर गदाई याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.