अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्हा गेल्या 10 ते 15 वर्षांपासून राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे. या ठिकाणी विधानसभेसह स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी सरस राहिलेली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर ही ताकद विभागली गेली असली तर येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यासह नगरपालिका, अहिल्यानगरच्या महापालिका निवडणुकीवर दोनही राष्ट्रवादीच्या काका, पुतण्याचा डोळा आहे.
या निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नगर जिल्हा महत्वाचा ठरणार असून या दौर्यात आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पवार काका, पुतण्या स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना काय कानमंत्र देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज पवार नगर जिल्ह्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा आज शुक्रवारी (दि. 29) श्रीगोंद्याला तर उद्या शनिवारी (दि. 30) मोठे पवार म्हणजे खा. शरद पवार नगर शहरात येत आहेत. दोन्ही पवारांच्या कार्यक्रमातील राजकीय भाष्याची उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा होणार आहे. माजी आ. बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव आ. विक्रमसिंह पाचपुते यांचे श्रीगोंदे तालुक्यातील बहुतांश विरोधक एकत्र आले आहेत व त्यांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांना ताकद देण्यासाठी अजितदादा श्रीगोंद्याला येत असल्याचे सांगण्यात आले.
आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीपूर्वी श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात होणार आहे. मागील काही दिवसापूर्वी घनःश्याम शेलार, नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, तालुकाध्यक्ष भगवानराव पाचपुते आदींसह माजी आमदार राहुल जगताप यांनी अजितदादा पवारांच्या उपस्थितीत होणार्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा श्रीगोंद्यातील संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात होणार आहे. शेतकरी कर्जमाफी व्हावी, तसेच घोड, कुकडी पाण्याचा प्रश्न, तालुक्यातील रस्ते व वीज प्रश्न, सिस्पे गुंतवणूकदार याचे पैसे मिळण्यासाठी उपाययोजना आदींसह संत शेख महंमद महाराज देवस्थानची वक्फ बोर्डाकडे झालेली नोंद आदी विषयांवर या मेळाव्यात चर्चा अपेक्षित आहे. तालुक्याच्या प्रश्नांची मांडणी होणार असल्याने अजितदादा त्यावर काय बोलतात व आ. विक्रमसिंह पाचपुतेंवर काही टीका करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
खा. पवार उद्या नगरमध्ये
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार शनिवारी (दि. 30) नगरला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी सहकार सभागृहात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. या सन्मान विचारांचा…कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. निलेश लंके, माजी खासदार यशवंतराव गडाख, पद्मश्री पोपटराव पवार व या समारंभाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारीच दुपारी 1.30 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी जिल्हा प्रभारी अशोक पवार, खा. निलेश लंके, प्रसाद तनपुरे, आ. रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार दादा कळमकर उपस्थित राहणार आहेत.




