मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी भीमथडी जत्रे लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.
साधारण, दोघांमध्ये एक मिनिट फोनवर बोलणं झालं. त्यामुळे उपस्थितीना नेमकं शरद पवारांनी कोणत्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना फोन लावला याबाबत उत्सुकता लागली होती. याबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे.
फोनवर झालेल्या संवादाबाबत विचारलं, असता शरद पवार म्हणाले, यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीला आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला त्यांनी यावं सर्व मराठी भाषिकांची आणि साहित्यिकांची अपेक्षा आहे. यानुसार मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं असून ते त्यांनी स्वीकारला आहे. 21 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होणार असून ते पुढील तीन दिवस चालणार आहे.
तसेच शरद पवारांनी परभणीचा दौरा केल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना इतकच सांगितलं की, स्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे त्याची नोंद तातडीने आणि गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
भीमथडी जत्रेचं यंदाचं हे १८ वं वर्ष आहे. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं. शरद पवारांच्या सूनबाई आणि आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार या भीमथडी जत्रेच्या आयोजिका आहेत. दरवर्षी पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात या जत्रेचं आयोजन केलं जातं. यंदाची ही जत्रा २५ डिसेंबरपर्यंत असणार आहे.