सातारा | Satara
शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यामुळे अजित पवार पुन्हा माघारी फिरणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.
सातारा येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना, अजित पवार परत आले, तर?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “प्रश्न असा आहे की, एकदा दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती दुरुस्त केली असेल, तर एक संधी द्यावी. त्यांना पक्षात वापस घेतलं. तुम्हाला आठवत असेल, पहाटेचा शपथविधीला त्यामध्ये आमचे एक सहकारी त्यामध्ये सहभागी होते. त्यामुळे आधी निर्णय घेतला होता आणि त्याच्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही. आमच्याकडून योग्य काम झालं नाही. पुन्हा अशा रस्त्याने जायचं नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतलेला होता. पण, संधी ही फार मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची नसते. मागितली तरी द्यायची नसते, असे सांगत शरद पवारांनी अजित पवारांना आता परत घेणार नसल्याचे म्हटले आहे.