Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींच्या 'त्या' टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले मागील ५६ वर्षांपासून मी…

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले मागील ५६ वर्षांपासून मी…

अजित पवारांबद्दल व्यक्त केली काळजी, राज ठाकरेंना लगावला टोला

नाशिक | Nashik

काल दिंडोरी आणि नाशिकच्या (Dindori and Nashik) महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून तिन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका करतांना शरद पवार (Sharad Pawar) देशाचे कृषीमंत्री असताना दहा वर्षात त्यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करत टीका केली होती. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीचा नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असा उल्लेख करत काँग्रेस (Congres) मुस्लीम धार्जिणे असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज मोदींच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “मी कृषीमंत्री असताना काय केले, असे पंतप्रधान मोदी विचारत आहेत. पण मी कृषीमंत्री असताना पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचा राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा तर मी इस्रायलला जात होतो. तेव्हा मोदींचा मला फोन आला होता. त्यावेळी अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला होता. त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर त्यांना इस्रायलला घेऊन जाण्याची विनंती केली. मी माझ्याबरोबर त्यांना इस्रायलला घेऊन गेलो. इस्रायलमध्ये मी मोदींना चार दिवस फिरवलं, शेतीचं नवं तंत्रज्ञान त्यांना दाखवलं. त्यावेळी मोदींना राज्याच्या विकासात मनापासून रस होता. पण हल्ली त्यांना फक्त राजकारणात रस आहे”, असे म्हणत पवारांनी मोदींना फटकारले.

तसेच पंतप्रधान मोदींच्या शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही, तर ते देश काय सांभाळतील या टीकेला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, “मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले तरी मी मागील ५६ वर्षांपासून विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काम करीत आहे. सध्याच्या घडीला त्यांनी एक तरी असा माणूस दाखवावा असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना केले. तर मोदींना कालच्या सभेत किरण सानप नावाच्या एका युवा शेतकऱ्याने कांद्यावर बोला असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, त्या तरुण शेतकऱ्याने मोदींना कांद्यावर बोला असा जो प्रश्न विचारला तो योग्य आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र, तो माझ्या पक्षाचा असल्यास त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचे कौतुक केले.

शरद पवारांनी मुंबईतील रोडशो वरुन मोदींना फटकारले

मुंबईसारख्या शहरात रोड शो आयोजित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. हे बरोबर नाही. तसेच त्यांनी फक्त गुजराती भागातचं दौरा केला असे शरद पवारांनी म्हटले. याशिवाय पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं काय चाललयं समजत नाही, मी असं ऐकले की नाशिक हा त्यांचा बेस आहे. मात्र ते इथं हल्ली ते दिसत नाहीत,” असे म्हणत राज ठाकरेंना पवारांनी टोला लगावला.

अजित पवारांबद्दल व्यक्त केली काळजी

बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला देखील त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यावरही शरद पवारांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नाहीत, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या