मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी शरद पवार गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पुढील चार दिवसांचे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना खोकला झाल्याने बोलण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्यक्रमांत त्यांना भाषण देता येत नाही. परिणामी पुढील चार दिवसांचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पवार हे सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये पवारांना बोलण्यास त्रास होत होता. यामुळे पवारांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याचे समजते आहे. आताही त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांचे पुढील ४ दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन वर्षांपूर्वी दोन गट झाले. अजित पवारांनी आपला पक्ष हा राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आणि शरद पवार वेगळे पडले. यानंतर आलेल्या लोकसभेत शरद पवारांनी जोरदार मुसंडी मारली. विधानसभेला मात्र पवारांना फारसे काही करता आले नाही. अजित पवार गट प्रबळ ठरला. मात्र त्यानंतर देखील शरद पवार यांनी हार मानली नाही, त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केली. महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. आताही त्यांचे दौरे सुरूच आहेत, मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढच्या चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.