पुणे | Pune –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी कर्मचार्यांना करोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या बारामतीतील निवासस्थानीही करोनाने शिरकाव केला आहे. गोविंदबाग या निवासस्थानातील चार कर्मचार्यांना करोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. NCP chief Sharad Pawar
मुंबईत सिल्व्हर ओक येथे करोनाचे 16 रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील 50 कर्मचार्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. करोनाची लागण झालेले चारही कर्मचारी पवारांच्या शेतात आणि बागेत काम करणारी आहेत. या चौघांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी 12 सुरक्षा रक्षक आणि कर्मचार्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तर पवारांचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 12 कर्मचार्यांना लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर पवारांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार यांना राज्यात दौरे न करण्याचं आवाहन केलं होतं. डॉक्टरांनीही पवारांना चार-पाच दिवस कुणालाही न भेटण्याचा सल्ला दिला होता.