पुणे | Pune
महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (28 नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. बाबा आढाव यांचे तीन दिवसांपासून उपोषण सुरु असून आज सकाळी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हंटले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, बाबांनी उपोषण सुरू केले आहे. ते या आत्मक्लेश उपोषणाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. लोकांच्या चर्चाही होती. कालच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधीही बघितल्या नव्हत्या. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात, त्या ठिकाणी असे कुठेतरी ऐकायला मिळते असे नाही. परंतु संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच हातात घेतली हे चित्र यापूर्वी दिसलेले नव्हते, पण हे आता महाराष्ट्रात बघायला मिळाले. आता त्याचा परिणाम लोकांच्या अस्वस्थता वाढली आहे. लोकांच्यातली चर्चा आहे, असेही शरद पवार म्हणाले.
निवडणुक आयोगावर विश्वास ठेवून चूक
मतदानाच्या शेवटच्या दोन तासातील टक्केवारी धक्कादायक असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच ईव्हीएम हॅक होऊ शकते यांचे काहींनी प्रेझेटेंशन दिले. पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला आहे. मात्र निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असे कधीच वाटले नव्हते. तसेच यापूर्वी असे कधीच घडले नाही, असे शरद पवारांनी सांगितले आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल. लोक जागृत आहेतच, त्यांना उठावासाठी तयार करावे लागेल. बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात आणि देशात सुरू असलेल्या प्रकाराबाबत संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहांमध्ये विविध पक्षांनी केला. तर त्यांना बोलून द्यायचे नाही. सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षांनी ते दोन्ही सभागृहामध्ये आमचे म्हणणे मांडायला संमती द्या, अशी मागणी करत आहेत. ती मागणी एकाही वेळेला सहा दिवसात मंजूर झालेली नाही. सत्तेचा गैरवापर आणि भल्या भल्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी आज या ठिकाणी दिसतात याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही पण आज जे प्रश्न उपस्थित झाले त्यांची नोंद आपल्याला घ्यावी लागेल असे शरद पवार म्हणालेत.