Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“शाईफेक चुकीचीच, पण...”; शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं

“शाईफेक चुकीचीच, पण…”; शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना फटकारलं

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईती पक्षाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक प्रकरणावर तसेच सध्या राजकारणात सुरु असलेल्या विविध घटनांवर भाष्य केलं.

- Advertisement -

‘शब्द काय वापरला भीक. हा वापरला नसता तर चांगलं झालं आहे. यानंतर लगेच सांगून टाकलं, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे केलं. याच्याआधी तुम्ही पाच वर्षी मंत्री होता, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होता. आताही तुम्ही मंत्रिमंडळात नेते आहात. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री झाले हे काय फक्त तुम्हीच आहात का? महाराष्ट्रात असे अनेक मंत्री झाले आहे, पण त्यांनी कधी असा कांगावा केला नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारलं.

शरद पवार पुढे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांनी फुलेंचा उल्लेख केला. आंबेडकरांचा उल्लेख केला. भाऊराव पाटील यांचा उल्लेख केला आणि मग शब्द वापरला भीक. हा शब्द कुणालाही आवडणार नाही. फुलेंचं आणि आंबेडकरांचं संपूर्ण जीवन संपूर्ण देशाला माहिती आहे. कर्मवीरांना आपलं जीवन ज्ञानदानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले, पण शिकणाऱ्या मुलांचं दोन वेळचं जीवन थांबू दिलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचं ब्रिद आहे कमवा आणि शिका, भिक मागा असं नाही. या संस्थेचा मी गेल्या ५० वर्षांपासून अध्यक्ष आहे. तिथे आम्ही कधी राजकारण आणत नाही. अशा संस्थापकांबाबत कर्मवीर भाऊरावांबाबत, फुलेंबाबत, आंबेडकरांबाबत बोलत असताना भीक मागणं असा शब्द वापरला नसतं तर बरं झालं असतं,’ असे शरद पवार म्हणाले.

तसेच शरद पवार यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. ‘काल नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचं उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.’ अशी टीका शरद पवारांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या