पुणे | Pune
सध्या पुणे शहरात जीबीएस नावाच्या आजाराने डोके वर काढले असून पुणे महापालिकेनेही याची दखल घेत समिती स्थापन केली आहे. पुणे शहरात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. आता या रुग्णांची संख्या २४ वर गेल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यातील १० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये मुलांचा आणि तरूणांचा समावेश आहे. अशातच आता शरद पवार यांनी ट्विट करून संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केलीये.
जीबीएस रोगाचे पुण्यात आढळून आलेल्या २४ संशयित रुग्णांपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण २ वर्षांचा आहे, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण ६८ वर्षांचा असल्याची माहिती आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात या आजारावरील १६ रूग्णांवर उपचार सूरू आहेत. यामध्ये १० रुग्ण हे तरूण आहेत, तर ६ रूग्ण हे लहान मुले आहेत. या १६ पैकी १० रूग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सूरू आहेत, अशी माहिती मिळत आहे. पुणे महापालिका प्रशासनाने या आजाराची दखल घेत कमिटी स्थापन केली असून यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.
जीबीएस आजाराचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केले आहे. “जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मिळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरिकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल.
दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे, असेही शरद पवार म्हणाले.
काय आहे गुलेन बॅरी सिंड्रोम
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या आजाराने बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पटकन लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, पाय, हात, फुप्फुस, श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.
हात आणि पायातील स्नायू कमकुवत होतात. रुग्णाला बसण्या व उठण्यात त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. काही रुग्णांमध्ये चालताना किंवा उभे राहताना तोल जातो. डोळ्याचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. दोन-दोन दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये गिळायला त्रास होतो. काहींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्नायू कमकुवतही होऊ शकतात. काहींना अर्धांगवायूचा त्रास सुरू होतो.