अकोले । प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय धुमशान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) येथे शरद पवारांची काल सभा पार पडली. तेव्हा अकोले विधानसभेत अमित भांगरे (Amit Bhangre) यांना बळ द्या, असं म्हणत शरद पवारांनी एकप्रकारे आपला उमेदवारच घोषित केला आहे. खुद्द शरद पवार यांनी दंड थोपटल्याने अजित पवार (Ajit Pawar) गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांची डोकेदुखी वाढली आहे.
तसेच शरद पवार आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट झाल्याची वंदता आहे. पण शरद पवारांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेत पहिल्यांदा गेलो तेव्हा आदिवासींचे प्रश्न तळमळीने मांडणारे यशवंतराव भांगरे तिथे बघितले. त्यानंतर ही जबाबदारी अशोकराव भांगरे यांनी घेतली. दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर निघून गेले. नव्या पिढीने अकोलेचे प्रश्न कसे सुटतील याची जबाबदारी घेतली आहे. अशोकरावांनी एकच मागणी केली होती की माझ्या मुलावर लक्ष ठेवा. त्यानंतर अकोले विधानसभेत अमित भांगरे यांना बळ द्या, असं म्हणत शरद पवारांनी एकप्रकारे आपला अप्रत्यक्षपणे उमेदवारच घोषित केला आहे.
हे देखील वाचा : अहिल्यानगर नामांतरास न्यायालयात आव्हान
तसेच २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी किरण लहामटे यांना निवडून आणले होते. आता त्याच शरद पवारांनी लहामटेंना धडा शिकविण्याचा विडा उचलला आहे. शरद पवार गटाने लोकसभेत लक्षणीय यश संपादन केले आहे. त्यामुळे या गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात आता खुद्द शरद पवारांनीच भांगरेंना बळ देण्याचे आवाहन केले आहे. परिणामी आ. लहामटे यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान उभे राहणार आहे.
विशेष म्हणजे २०१९ विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी पिचड यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण काल पिचड पिता-पुत्राबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे देखील वाचा : दूध दराबाबत मंत्री विखे पाटलांचे केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र; केली…
कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही…
यावेळी शरद पवारांनी डॉ. लहामटे यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टोलेबाजी केली. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे. शब्दाला किंमत देईल. त्यांनी म्हटलं की काही झालं तरी पवार साहेबांना सोडणार नाही. पण मुंबईत गेल्यानंतर हा भलतीकडेच जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे. आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठिशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलल्याशिवाय राहाणार नाही, असे आश्वासनही पवारांनी दिले.
हे देखील वाचा : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट