मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नवी दिल्लीतील (New Delhi) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलतांना “ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena UBT) दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असे वक्तव्य केले होते.त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की,” संजय राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या. नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं. त्या संबंधात संजय राऊत जे बोलले ते योग्य आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”साहित्य संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. त्यामुळे मी म्हटलं की पडदा टाका. संजय राऊत यांना माझ्यावरही जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही कारण मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. माझी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत काही तक्रार नाही. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?
कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटले होते.