Saturday, July 27, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या 'त्या' नेहमीच्या खदखदीवर शरद पवारांचे थेट उत्तर; म्हणाले...

अजित पवारांच्या ‘त्या’ नेहमीच्या खदखदीवर शरद पवारांचे थेट उत्तर; म्हणाले…

मुंबई | Mumbai

मागील वर्षी जुलै २०२३ मध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधील ४२ आमदारांना (MLA) सोबत घेऊन शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. मात्र, अजित पवारांच्या या भूमिकेला शरद पवारांनी विरोध केला. त्यांनतर आजपर्यंत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये विविध मुद्द्यावरून वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच लोकसभेच्या एका प्रचारसभेत बोलतांना अजित पवारांनी आम्ही तुमच्या (शरद पवार) पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असे म्हटले होते. त्यावर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत थेट उत्तर दिले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्व काही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेदभाव कधीही केला नाही. सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, या अजित पवार यांच्या दाव्यात काहीही तथ्य नसून त्यांची पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही, ही ओरड निरर्थक आहे, असे त्यांनी म्हटले.

तसेच पुढे ते म्हणाले की, “सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेत्या आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही, असेही शरद पवारांनी म्हटले. त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या