Friday, November 22, 2024
Homeनगरमहिलांना पैशापेक्षा संरक्षण व सन्मान आवश्यक - शरद पवार

महिलांना पैशापेक्षा संरक्षण व सन्मान आवश्यक – शरद पवार

केंद्र सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

लाडकी बहिण योजनेतील 1500 रूपयांमुळे महिलांचे प्रश्न कायमचे सुटणार नाहीत. पैसे देताय पण, महाराष्ट्रात मुली, महिला सुरक्षित नाहीत. मागील काही काळात 700 पेक्षा जास्त अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. लहान मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. महिलांना पैशापेक्षा जास्त संरक्षण व सन्मानाची गरज असल्याचे मत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कोपरगाव येथे ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकार शेतकर्‍यांच्या हिताची काळजी घेत नाही. जो पिकवतो त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. मी कृषीमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधानांना घेऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाचा दौरा केला. त्याचा अहवाल सादर करून 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली. तसा आधार देण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राचे विद्यमान सरकार भ्रष्टाचारी आहे. राजकारण आणि सत्ता बदलासाठी तरूणांना संधी देण्याचे धोरण आम्ही ठरविले आहे. त्यामुळेच निवडणुकीत तरूण उमेदवार उतरविले आहेत.

पवार पुढे म्हणाले की, देशाचे संविधान बदलण्यासाठी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत 400 जागा पाहिजे होत्या. त्यासाठी त्यांनी ‘अबकी बार 400 पार’चा नाराही दिला होता. मोदी सरकार 400 पार झाले तर घटना बदलतील हे जनतेच्या लक्षात आल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

चौकशीच्या फाईल्स गायब
आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, आताचे महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावर उभे आहे. मंत्रीमंडळातील अनेकजण चौकशीच्या फेर्‍यात होते. मात्र सत्तेत सामील होताच, या नेत्यांच्या फाईल्स दिसेनाशा झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा अहंकार आम्ही कमी केला. आता महाराष्ट्रात देखील महायुतीला सत्तेतून दूर करायचे आहे. रोजगाराचे, शेतकर्‍यांचे प्रश्न या सरकारने सोडविले नाहीत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे सरकार बदलावेच लागेल. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सात दिवसांत दोन लाखांपर्यंत कर्ज माफीचा निर्णय घेतला होता. करोना काळातही सर्वात चांगले काम महाराष्ट्रात झाले होते, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या