Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार यांचा पुढील महिन्यात नाशिक दौरा

शरद पवार यांचा पुढील महिन्यात नाशिक दौरा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिक केंद्रस्थानी ठेवत नाशिकचा दौरा करत येवल्यात सभा घेत शक्ती प्रदर्शन केले. याच अनुषंगाने बुधवार (दि.26) नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची त्यांनी दिल्लीत बैठक घेऊन नाशिक शहरासह जिल्ह्यातील आढावा घेतला. शरद पवार यांनी 15 ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पुन्हा नाशिकचा दौरा करणार असल्याचे सांगितले. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून नऊ मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर शरद पवार यांनी मुंबई येथे पदाधिकार्‍यांचा मेळावा घेऊन नाशिक केंद्रस्थानी ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या सोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात मेळावा घेत वयाबाबत न बोलण्याचा सल्ला देत येवलेकरांची माफी मागितली.

नाशिक शहरातून अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात गेले असले तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन शेलार व माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात शरद पवार यांना साथ देण्याचे ठरवले व दत्तात्रय माळोदे यांना बरोबर घेत जिल्हा दौर्‍याला सुरुवात केली . त्रंबकेश्वर , नांदगाव , मनमाड , कळवण , सटाणा, मालेगाव, सिन्नर , देवळाली मतदार संघ आणि शहरातील विविध भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जरी आज अजित पवार यांच्याकडे गेले असतील तरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र शरद पवार यांच्या सोबत आहेत.अनेक कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असून ते मात्र वेळेवर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पण तेही पुन्हा शरद पवार यांच्याच सोबत राहणार असल्याचा विश्वास देखील पिंगळे यांनी व्यक्त केला. 15 ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान शरद पवार हे नाशिक दौर्‍यावर येणार असून प्रवेश सोहळा होणार आहे. नाशिकचा दौरा झाल्यानंतर शरद पवार जळगाव येथे जाणार आहेत.

गोकुळ पिंगळेंची जवळीक

माजी खासदार देवीदास पिंगळे शरद पवार यांच्या अगदी जवळचे.मात्र, त्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली.त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांच्यावर बाजार समितीच्या निवडणुकीत अन्याय झाला . तेव्हा पासून देवीदास पिंगळे व गोकुळ पिंगळे यांच्यात दुरावा वाढला . त्यामुळे देवीदास पिंगळे यांनी शरद पवारांची साथ सोडताच त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांनी मात्र,शरद पवारांना साथ देणे पसंद केले . त्यामुळे आता गोकुळ पिंगळे यांची शरद पवार यांच्या कडे जवळीक वाढणार आहे.

मतदारसंघांचा आढावा

शरद पवार यांनी नाशिकमधील पदाधिकारी कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय माळोदे यांना बोलाऊन घेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे याबाबत विचारणा केली.

देवळाली मतदारसंघाची चौकशी

देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्या. त्यामुळे शरद पवार यांनी विशेषतः देवळाली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. काय परिस्थिती राहील याबाबत विचारणा केली. तर आगामी निवडणुकीसाठी काय करता येईल? कोण कोण या मतदारसंघातून तयारी करत आहेत? याबाबतदेखील विचारणा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या