Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…

शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सरकारी नोकरीचे लक्ष्य ठेवत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीवर चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी म्हणून यासाठी मी गेल्या काही दिवसापासून प्रयत्नशील आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बैठक आयोजित करण्याबाबत आपल्या व्यस्त कार्यक्रमातून तातडीने वेळ मिळेल, अशी अपेक्षा पवार यांनी पत्रात व्यक्त केली.

वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणवर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता असून प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेऊनही त्यांच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने हा विषय संवेदनशील झाला आहे. राज्यात ३२ लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. परंतु सद्यस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे, असे नमूद करत पवारांनी पाच प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे पत्रात लक्ष वेधले आहे.

पुढे ढकलण्यात आलेली राज्य सेवा परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी. या परिक्षेत कृषी सेवेच्या २५८ जागांचा समावेश करावा, दरवर्षी एप्रिल – मे महिन्यात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करावी. या जाहिरातीत विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या पदांची वाढ करावी. राज्यसेवा, कृषी सेवा, पोलीस उपनिरिक्षक, विक्रीकर सहाय्यक वगैरे सरळ सेवेतील पदांवर निवड होऊन बराच कालावधी उलटूनही पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्याचा आढावा घेऊन पात्र विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती द्याव्या. लिपिक पदांकरिता सात हजाराहून अधिक जागांची भरती यासह काही अन्य भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या आहेत. त्यावर त्वरित निर्णय घ्यावा आणि राज्यात शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या बहुतांश जागा रिक्त असल्याने नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती तसेच प्राध्यापक भरतीला देखील गती देण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या