Friday, May 17, 2024
Homeजळगावखा. शरद पवारांचा मुक्काम कुणाला फुटणार घाम?

खा. शरद पवारांचा मुक्काम कुणाला फुटणार घाम?

चोपडा, भुसावळ आणि मुक्ताईनगरात आज सभा

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार हे उद्या दि. ३ व ४ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. या दोन दिवसीय दौर्‍यात खा. पवार यांचा जळगाव येथे मुक्काम राहणार आहे. निवडणूक काळातील त्यांचा मुक्काम कुणाला घाम फोडणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -


जिल्ह्यात जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी सरळ लढत दोन्ही मतदारसंघात होत आहे. यापैकी रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे भाजपाच्या विद्यमान खा. रक्षा खडसे यांच्याविरूध्द निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपाप्रवेशाची घोषणा केल्याने रावेर मतदारासंघातील ही लढत शरद पवार गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे निवडणुक काळात कुठलीही कसर राहू नये यासाठी खुद्द खा. शरद पवार हे उद्या दि. ३ व ४ रोजी जिल्ह्यात मुक्कामी दौरा करीत आहे. दि. ३ रोजी सकाळी १०.३० वा. शरद पवारांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहेे. तेथून ते स. ११.३० वा. चोपडा, दुपारी ३ वा. भुसावळ आणि सायंकाळी ६ वा. मुक्ताईनगर येथे प्रचार सभा घेणार आहेत. तिनही ठिकाणच्या प्रचारसभा आटोपल्यानंतर खा. शरद पवार हे जैन हिल्स येथे मुक्काम करणार आहेत.


पवारांचा मुक्काम राजकीय गणिते फिरविणारा

खा. शरद पवार यांचा जिल्ह्यात निवडणूक काळातील दुसरा दौरा होत आहे. या दौर्‍यात ते मुक्कामी राहणारा असल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ज्या-ज्या वेळी खा. शरद पवार मुक्काम करतात त्या-त्या वेळी ते बेरजेचे राजकारण करतात असा संकेत आहे. तसेच जिल्ह्यातील राजकीय गणिते देखिल त्यांच्या मुक्कामात फिरल्याचा पुर्वानुभव राहीला आहे. ऐन लोकसभा निवडणूक काळातील खा. शरद पवारांचा हा मुक्कामी दौरा जिल्ह्याच्या राजकारणावर कसा परिणाम करणारा ठरेल? याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या