कळवण | प्रतिनिधी Kalwan
आदिशक्तीचे आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवातील ‘ललिता पंचमी’च्या निमित्ताने भाविकांच्या भक्तीचा महापूर अनुभवायला मिळाला.
पहाटेच्या पहिल्या किरणांपासून ते अगदी रात्रीच्या शांत पहारापर्यंत गडावर नुसती माणसेच माणसे दिसत होती. ललिता पंचमी निमित्त देवीची पंचामृत महापूजा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक व तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारुळे यांनी केली. ललिता पंचमीनिमित्त पंचामृत महापूजेप्रसंगी कुमारिका म्हणून ऋतुजा काळे ह्या देखील उपस्थित होत्या.
या महापूजेप्रसंगी सिल्लोड येथील सांडू बाविस्कर यांना महापूजेप्रसंगी उपस्थित राहण्याची संधी विश्वस्त संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, नारद आहिरे, प्रशांत निकम आदींसह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. ललिता पंचमीचे औचित्य साधत खान्देशच्या प्रांतापासून ते थेट गुजरातच्या पर्यंतचे भाविक देवीच्या दर्शनाच्या ओढीने गडावर दाखल झाले होते.
गुरुवारी दिवसभरात साधारणपणे ५० हजार भाविकांनी देवीच्या चरणी माथा टेकवत दर्शन घेतले. दर्शन रांगेत तासनतास उभं राहून लहान मुलांना खांद्यावर घेणारे आई-वडील, थकलेल्या आजी-आजोबांना हळूच आधार देणारी तरुणाई असे चित्र अनुभवायला मिळाले. विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन केले असल्यामुळे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली.
दिवसभर भाविकांच्या भक्तीने उजळून निघालेला सप्तशृंगगड संध्याकाळच्या वेळी विद्युत रोषणाईच्या प्रकाशात न्हाऊन निघाला, तेव्हा संपूर्ण परिसर एखाद्या जिवंत काव्यासारखा भासत होता. दर्शन करून परतताना प्रत्येक भाविकाच्या चेहर्यावर शारीरिक थकवा होता, पण आत्मिक समाधानाची एक अनोखी चमकही स्पष्ट दिसत होती. ललिता पंचमीचा हा दिवस फक्त गर्दीचा म्हणून नाही, तर सप्तशृंगी मातेशी जोडलेल्या अतूट नात्याचा आणि भक्तीचा सोहळा ठरला.
गुरुवारी, फ्यूनियुलर रोपवे येथील सभागृहात, सद्यस्थितीत सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सव या संदर्भात विविध विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. भाविकांना दिल्या जाणार्या सोयी सुविधा व उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.



