सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Gad
उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. या विशेष पर्वावर आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. सहाव्या माळेची देवीची पंचामृत महापूजा दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे व नाशिक येथील देणगीदार भाविक अॅड. सचिन देशमुख यांनी केली. यावेळी विश्वस्त संस्थेच्या वतीने शेगाव येथील भाविक पुरुषोत्तम निंबाळकर यांना महापूजेप्रसंगी उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. प्रसंगी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, विश्वनाथ बर्डे, ग्रामस्थ संदीप बेनके, राजेश गवळी आदींसह भाविक उपस्थित होते.
सहाव्या माळेच्या निमित्ताने पहाटे पासून शिवालय परिसरात स्नानासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. सकाळी सात ते नऊ या वेळेत मातेला विशेष अलंकार, भरजरीचे जांभळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात आले. त्यानंतर साजशृंगार करण्यात आला. “श्री सप्तशृंगी मातेचा उदो उदो” आणि “अंबे माता की जय” या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. सहाव्या माळेचे औचित्य साधत दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे सर्वेसर्वा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी देवीची महानैवेद्य आरती केली.
सहावी माळ ही नवरात्रोत्सवाचा उत्तरार्ध सुरू असल्याचे दर्शवते, त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतून हजारो भाविक मातेच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झाले होते. पायरी मार्ग आणि फ्युनिक्युलर रोपवे परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टतर्फे २४ तास दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गडावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि ट्रस्ट्रतर्फे पिण्याचे पाणी, अन्नपूर्णा प्रसादालयामार्फत महाप्रसाद, धर्मार्थ रुग्णालया मार्फत प्रथमोपचार व तसेच एस टी महामंडळामार्फत भाविकांच्या वाहतूकीची व्यवस्था सुरळीत सुरू आहे.




