नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे त्याचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारावर आज (दि. १९ सप्टेंबर) सुरुवातीच्या व्यवहारावर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टीमध्ये विक्रमी उच्चांक गाठत तेजीत सुरु आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. आज सेन्सेक्सने ८३,३५९.१७ ची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टी प्रथमच २५,५०० च्या वर गेला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.५० टक्के कपात केली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.
ऑईल आणि गॅस वगळता निफ्टीच्या सर्व क्षेत्रातील निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. रियल्टी आणि आयटीचा निफ्टी निर्देशांक १-१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा चांगला कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ३.०९ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.०९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने चार वर्षानंतर व्याजदारात कपात केल्याने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचे सावट हटले आहे. जपानचा बाजार २ टक्क्यांनी वाढला आहे. याचा सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आज सुरुवातीच्या व्यवहारात मिडकॅप आयटी समभागांमध्ये चांगली वाढ झाली.
सेंसेक्सची घोडदौड
आज, BSE सेन्सेक्स ४१०.९५ अंकाच्या वाढीसह ८३,३५९.१७ वर सुरू झाला आणि NSE निफ्टी १०९.५० अंक किंवा ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह २५,४८७.०५ वर सुरू झाला. बँक निफ्टी त्याच्या सार्वकालिक उच्चांकाने फक्त ४ अंकांनी मागे होता पण त्याचे शेअर्स मार्केटला मोठा उत्साह देत आहेत. काल आयटी शेअर्समध्ये घसरण झाली होती पण आज यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे आयटी शेअर्स प्रचंड वाढले आहेत. मिडकॅपमध्ये १ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये अर्धा टक्का वाढ झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा