श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक डिमॅट आणि ट्रेडिंग खातेच कंपनीने उघडले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या अज्ञानाचा फायदा घेत कंपनीने त्यांची दिशाभूल केली आहे.
शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी कुठल्याही कंपनीला, व्यक्तीला डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडणे आवश्यक आहे. डिमॅट खाते हे शेअर्स आणि इतर सिक्युरिटीज साठवण्यासाठी वापरले जाते, तर ट्रेडिंग खाते हे शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी वापरले जाते. या खात्याची नोंद सीडीएसएल किंवा एनएसडीएल यांच्याकडे असते. डिमॅट खाते उघडण्यासाठी, सेबीकडून मान्यताप्राप्त डिपॉझिटरी पार्टिसिपंट निवडणे आवश्यक आहे. डिमॅट खात्याला एक 16 अंकी डिमॅट खाते क्रमांक असतो, जो डिपॉझिटरी पार्टिसिपंट आयडेंटिफिकेशन आणि खाते क्रमांकासोबत जोडलेला असतो.
दरम्यान, ठेवीदारांना चुना लावणार्या मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडे शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी परवानगी, डिमॅट आणि ट्रेडिंग खातेच नाही. ठेवीदारांची दिशाभूल करण्यात आली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून परतावा देत असल्याचे कंपनीकडून भासवण्यात आले. त्यामुळे अनेकांनी कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केली. आता कंपनीकडून पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेले ठेवीदार हवालदिल झाले आहेत.