संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चौघांनी सुमारे 60 ते 62 लोकांची 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत आश्वी बुद्रुक येथील योगेश रामदास जर्हाड (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या गावातील मित्र राहुल शिंदे आणि ओळखीचे विजय काळे या दोघांनी जर्हाड यांना शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार अदमास डेफ्ट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रथम वेल्थ मॅनेजमेंट ऑफिसमध्ये बोलावून महेश मोरे याच्याशी भेट घालून दिली. राहुल शिंदे याने पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून चांगले पैसे भेटतील, असे आमिष दाखविले होते.
त्यावरून जर्हाड यांच्याप्रमाणेच इतर सुमारे 60 ते 62 लोकांना देखील शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा मिळेलफ, असे सांगत त्यांची फसवणूक केली. जर्हाड यांनी त्यांचे पैसे गुंतवणूक केल्यावर सुरुवातीला दोन महिन्याचा परतावा 11 टक्क्याने दिला. मात्र, त्यानंतर पुढील महिन्यापासून परतावा देण्यास टाळाटाळ केली. मग, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी योगेश जर्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी महेश विश्वास मोरे (रा.माळेगाव पठार, ता.संगमनेर), वैभव विठ्ठल काकड (रा.डोळसणे-घारगाव, ता. संगमनेर), राहुल शिंदे (रा.आश्वी बुद्रुक, ता.संगमनेर), विजय तबाजी काळे (रा.मालदाड रस्ता, संगमनेर) अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.





