अहिल्यानगर |सचिन दसपुते|Ahilyanagar
शेअर बाजारात गुंतवणूक करा, आयपीओमध्ये पैसे टाका, 10 ते 20 टक्के ट्रेडिंग नफा आणि आयपीओमध्ये थेट 100 टक्के रिटर्न! अशा गोड शब्दांच्या आमिषाला बळी पडून अहिल्यानगर शहरातील एका डॉक्टरला तब्बल एक कोटी 60 लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली असून, सोशल मीडियावरून चालणार्या आर्थिक फसवणुकीचा हा केवळ एक नमुना आहे. गेल्या वर्षभरात अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, कोट्यवधी रूपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या घशात गेली आहे. सुशिक्षित नागरिक शेअर मार्केट, आयपीओ, क्रिप्टो, डिजिटल गुंतवणूक याबाबत उत्सुक आहे. मात्र, अधिकृत बँक, नोंदणीकृत ब्रोकर किंवा आर्थिक सल्लागाराऐवजी सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे हीच या फसवणुकीची सुरूवात ठरते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास अनेक नागरिक याविषयीची माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअॅपवरील शेअर मार्केट ग्रुपमध्ये प्रवेश करून घेतात. अशा ग्रुपमध्ये नफ्याची बनावट यशोगाथा, नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट पाहून अशा जाळ्यात हळूहळू गुंतवणूकदार अडकतो. यानंतर सायबर गुन्हेगार गुंतवणूकदाराच्या संपर्कात येतात. ते गुंतवणूकदारांना बनावट ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविल्यानंतर सुरूवातीला ट्रेडिंग अॅपवर नफ्याचे वाढीव आकडे दिसतात. काही लाख किंवा कोटी रूपयांवर नफा झाल्याचा आभास निर्माण केला जातो.
मात्र, जेव्हा प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा अॅप बंद होते, अकाऊंट फ्रीज होते, संपर्क साधणारे नंबर बंद होतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. शहरातील डॉक्टरची आयपीओ व ट्रेडिंगच्या नावाखाली एक कोटी 60 लाखांची फसवणूक झाली. यासंदर्भातील गुन्हा शुक्रवारी (2 जानेवारी) दाखल झाला. यापूर्वी देखील शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील आयटी इंजिनिअरची एक कोटी 10 लाखांची तर शिर्डी येथील महावितरणमधील सेवानिवृत्त व्यक्तीची 50 लाखांची फसवणूक झाल्याचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे तिन्ही प्रकरणे सोशल मीडियावरील ओळखींपासून सुरू झाली होती.
‘हमखास परतावा’ हीच सर्वात मोठी फसवणूक आहे. शेअर मार्केटमध्ये 100 टक्के हमखास नफा अशी कोणतीही योजना नसते. अधिकृत बँक, सेबी नोंदणीकृत ब्रोकर कधीही अशी हमी देत नाहीत. तरीही, सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती, खोट्या यशकथा, अनोळखी लोकांचा गोड बोलण्याचा सापळा यामुळे सुशिक्षित नागरिक बळी पडत आहेत. आज आर्थिक फसवणूक ही केवळ अशिक्षितांची समस्या राहिलेली नाही. सुशिक्षित, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर यांनाही ती गाठत आहे. सोशल मीडियावर दिसते ते सर्व खरे नसते हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने सजग राहणे ही काळाची गरज आहे.
फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदार सायबर पोलिसांशी संपर्क साधतात. मात्र त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते, कारण फसवणूकीचा कालावधी जास्त असतो. गुंतवणूकदार सायबर पोलिसांकडे तक्रार उशिरा दाखल करतात. तोपर्यंत पैसे अनेक खात्यांत फिरवलेले असतात, आरोपी बाहेरच्या राज्यातील किंवा देशातील असतात. यामुळे सायबर पोलिसांच्या तपासाला मर्यादा येतात आणि फसवणूकग्रस्तांची रक्कम परत मिळण्याची आशा धूसर होते.
सायबर पोलिसांचे आवाहन
सोशल मीडियावरील शेअर मार्केट संदर्भातील माहितीवर विश्वास ठेवू नका, अनोळखी व्यक्ती, ग्रुप, अॅप यांपासून दूर रहा, केवळ बँक व सेबी नोंदणीकृत अधिकृत गुंतवणूकदारांमार्फतच गुंतवणूक करा, संशयास्पद मेसेज, कॉल किंवा लिंक आल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन येथील सायबर पोलिसांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग
सायबर पोलिसांनी यापूर्वी अशाच एका प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीत चीनमधील नागरिकांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. भारतीय रूपयांचे डिजिटल करन्सीत रूपांतर करून कंबोडियामधील कंपन्यांमार्फत पैसे हस्तांतर केले जात असलेल्याची माहिती तपासात समोर आली होती. सायबर पोलिसांनी महाराष्ट्रात पकडलेल्या सहा आरोपींकडून 12.92 लाखांची रोकड जप्त केली होती.




