अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या वृध्द व्यक्तीची तब्बल 61 लाख 61 हजार 789 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित वृध्द व्यक्तीने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुंतवणुकीच्या नावाखाली बनावट अॅप व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
तांबटकर मळा, गुलमोहर रस्ता परिसरातील व्यक्तीने (वय 72) दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सेवानिवृत्त असून पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवृत्तीवेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला शेअर मार्केट सल्लागार असल्याचे सांगत, त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास 20 टक्क्यापर्यंत नफा मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ‘अनॅन्टियम प्रो’ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. अॅपवर खाते उघडल्यानंतर विविध गुंतवणुकींवर मोठा परतावा मिळत असल्याचे दर्शवले जात होते.
यानंतर केशव परवाल नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून एका ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. ग्रुपमधील मार्गदर्शनानुसार विविध बँक खात्यांवर आरटीजीएस, आयएमपीएस व युपीआय व्दारे 22 डिसेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान टप्प्याटप्प्याने रक्कम पाठविण्यात आली. या व्यवहारांमध्ये दहा हजारांपासून ते 20 लाख 11 हजार 789 रूपयांपर्यंत रकमा विविध खात्यांवर जमा करण्यात आल्या. एकूण रक्कम 61 लाख 61 हजार 789 रूपये इतकी झाली.
दरम्यान, गुंतवलेली रक्कम व नफा परत मिळविण्यासाठी संपर्क साधला असता, संबंधितांनी एकूण रकमेच्या 20 टक्के अतिरिक्त रक्कम भरल्याशिवाय पैसे परत मिळणार नाहीत असे सांगितले.
फिर्यादीने स्वतःकडे भरण्यासाठी रक्कम नसल्याचे सांगून, गुंतवलेल्या पैशांतूनच वजा करण्याची विनंती केली; मात्र आरोपींनी त्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तोच प्रतिसाद मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. फिर्यादीने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल तसेच 1930 हेल्पलाईनवर तक्रार नोंदवून सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात केशव परवाल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन, तसेच अन्य काही मोबाईल क्रमांक धारकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





