Monday, June 24, 2024
Homeनगरबँकॉकला पळालेला तरुण भारतात येताच गजाआड

बँकॉकला पळालेला तरुण भारतात येताच गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक करून बँकॉक येथे गेलेल्या तरुणाला भारतात येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. बाळासाहेब निवृत्ती काळे (रा. रूपमातानगर, सावेडी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला कलकत्ता येथील विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.

शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल तेरा कोटी 49 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार ऑगस्ट 2023 मध्ये नगर शहरात समोर आला होता. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिन्यांला पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला व याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रियंका सुरपुरिया (रा. सावेडी रस्ता, दनगर) यांनी फिर्याद दिली होती.

बाळासाहेब काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी, नगर) या तीन जणांवर गुन्हा दाखल आहे. फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे बँकॉक येथे गेला होता. त्याच्याविरूध्द पोलिसांनी लुक आऊट नोटीस काढली होती. काळे बँकॉक येथून कलकत्ता विमानतळावर येताच विमानतळ प्रशासनाने नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती दिली. निरीक्षक चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार दीपक गाडीळकर, अजय खोमणे, योगेश घोडके, जया म्याना, गोरे यांच्या पथकाने काळे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या