दिल्ली । Delhi
बांगलादेशातील सत्तांतराच्या काळात विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेला आणि ‘इन्कलाब मंचा’चा प्रवक्ता शरीफ उस्मान हादी याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी, १८ डिसेंबर २०२५ रोजी त्याचे निधन झाले. गेल्या आठवड्यात ढाका येथे निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. हादीच्या निधनामुळे संपूर्ण बांगलादेशात शोककळा पसरली असून अनेक शहरांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी ढाका येथील पलटन भागात रिक्षामधून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हादीच्या डोक्यात गोळी झाडली होती. या हल्ल्यानंतर त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने त्याला एअर अँब्युलेन्सद्वारे सिंगापूरला हलवण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरमधील डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्रालय आता हादीचा मृतदेह ढाका येथे पाठवण्यासाठी बांगलादेश उच्चायुक्तांच्या संपर्कात आहे.
३२ वर्षीय शरीफ उस्मान हादी हा बांगलादेशातील राजकीय परिवर्तनाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात असे. शेख हसीना यांचे १५ वर्षांचे शासन उलथवून लावणाऱ्या विद्यार्थी उठावात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. तो ‘इन्कलाब मंच’ या कट्टरपंथी गटाचा वरिष्ठ नेता आणि प्रवक्ता होता. मोहम्मद युनूस सरकारने त्याच्या संघटनेवर बंदी घातली असली, तरी हादी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ढाका-८ या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरला होता. उस्मान हादी आपल्या वादग्रस्त आणि भारतविरोधी भूमिकेसाठी विशेषतः ओळखला जात असे. त्याने सोशल मीडियावर अनेकदा ‘ग्रेटर बांगलादेश’चा नकाशा प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये भारताच्या काही भूभागांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्या या भूमिकेमुळे तो सतत चर्चेत असायचा.
हादीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ढाकासह बांगलादेशाच्या विविध भागांत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत संतप्त जमावाने निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोन संशयितांचे फोटो जारी केले असून, त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास ५० लाख टका (सुमारे ४२,००० डॉलर्स) बक्षीस जाहीर केले आहे. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून सीमा सुरक्षा दलाला (BGB) हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
मोहम्मद युनूस यांनी उस्मान हादीच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सरकारने शनिवारी बांगलादेशात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला असून, या दिवशी सर्व सरकारी आणि खासगी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी जुम्माच्या नमाजानंतर हादीसाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. सरकारने हादीच्या कुटुंबाची आणि त्याच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासनही दिले आहे.
दरम्यान, या हत्येवरून बांगलादेशातील काही कट्टरपंथीयांनी भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हादीच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा खोटा नरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवला जात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून बांगलादेश सरकार दोषींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.




