नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वेगळ्या स्मारकाचा ठेवलेल्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केला. २०२० मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचा (प्रणव मुखर्जी) मृत्यू झाला तेव्हा काँग्रेस नेतृत्वाने शोकसभादेखील आयोजित केली नव्हती किंवा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली नाही. उलट याबाबत काँग्रेस नेतृत्वाने आपली दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्सवर दिलेल्या निवेदनात असा दावा केला आहे की, बाबांचे ज्यावेळी निधन झाले, त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितले की, राष्ट्रपतींसाठी अशाप्रकारे शोकसभा आयोजित केली जात नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबांच्या डायरीतून मला कळले की, माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचे निधन झाल्यानंतर कार्यकारी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती आणि बाबांनीच शोक संदेशाचा मसुदा लिहिला होता.
याशिवाय, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सी. आर. केसवन यांच्या ‘X’वरील एका पोस्टचा हवाला दिला आहे. काँग्रेसने गांधी कुटुंबाचे सदस्य नसलेल्या इतर ने्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा सी. आर. केसवन यांनी केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले डॉ. संजय बारू यांच्या ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचाही उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस नेतृत्वाने 2004मध्ये निधन झालेले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे दिल्लीत कोणतेही स्मारक उभारलेले नाही. उलट, काँग्रेसने नरसिंह राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीऐवजी हैदराबादमध्ये करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे, असे केसवन यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारकाची मागणी केली. तेव्हा हा संपूर्ण वाद सुरू झाला. यावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नाराजी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती असलेल्या त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने सीडब्ल्यूसीची शोकसभाही कशी बोलावली नाही याची आठवण त्यांनी सांगितली.