Saturday, July 27, 2024
Homeनगरबंदिस्त सभामंडपावरील खर्च वाढणार ?

बंदिस्त सभामंडपावरील खर्च वाढणार ?

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शासन आपल्या दारी म्हणत राज्य सरकारने विविध गावांमध्ये मांडव टाकला. लाखो लोकांना मदत केल्याचा दावा याद्वारे सरकार करत आहे. मात्र महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघातील शिर्डीमध्ये ठरलेला दरबाराचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे तारीख पे तारीख हेलकावे खात आहे. 6 ऑगस्ट रोजी होणारा कार्यक्रम 7 रोजी होणार म्हणून तयारी सुरू झाल्यानंतर आता 11 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र कार्यक्रमाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच उभारण्यात आलेल्या बंदिस्त सभामंडपावरील खर्चाचा बोजा आता अधिक वाढणार का आणि तो जनतेच्या पैशातून चुकता केला जाणार का? तसे झाले तर या चुराड्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

शिर्डी मतदारसंघातील कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमासाठी शिर्डी विमानतळाजवळ भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. आधी सरकारी लाभ गाजावाजा करत दिला जायचा. आता त्यासाठी सरकारी ‘प्रदर्शना’ची पद्धत सुरू झाली आहे. हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमविण्यासाठी प्रशासनाला कामाला लावण्यात आले आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी जिल्ह्यातून स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थी सकाळी या बसमध्ये बसून शिर्डीला येतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

शासकीय यंत्रणा लाभार्थ्यांच्या संपर्कात आहे. महिनाभरापासून ही तयारी सुरू आहे. लाभार्थींना घेऊन येण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त केलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकारी शक्तीप्रदर्शन यशस्वी करायचे, असा निर्धार शासनाने केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त नियोजनामुळे वारंवार हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण वाढला आहे. सरकारी कार्यक्रमाच्या तारखा अशा वारंवार विस्कळीत का होतात, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे. या कार्यक्रमासाठी आठ दिवसांपासून बंदिस्त मंडप उभारून तयार आहे. मंडपाचा एका दिवसाचा ठेका ‘मोठ्ठा महागडा’ असल्याची चर्चा आहे. ठेकेदाराला एका दिवसांचा खर्च अदा केला जाणार की पहिली तारीख जाहीर झाल्यापासून सर्व दिवसांचेे भाडे मोजले जाणार? याबाबत चर्चा रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या