Saturday, July 27, 2024
Homeनगर‘शासन आपल्या दारी’साठी विद्यार्थ्यांचे केले हाल

‘शासन आपल्या दारी’साठी विद्यार्थ्यांचे केले हाल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अहमदनगर जिल्ह्यात सरकारच्या वतीने शिर्डी काकडी विमानतळ येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती व्हावी म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय करत संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस पाठविल्या. या घटनेच्या संगमनेर एनएसयुआयने तीव्र निषेध केला आहे. तर ही करोडो रुपयांची उधळपट्टी होत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी केली आहे.

- Advertisement -

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ जन्य परिस्थिती असल्याने शेतकरी व सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. राजकारणात सत्तेसाठी होत असलेल्या तडजोडीवर सामान्य माणसाची तीव्र नाराजी असून हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात होत असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती राहणार नाही, याची जाणीव सत्ताधारी व प्रशासनाला होती.

जास्त गर्दी दिसावी याकरिता प्रशासनाने काकडी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नागरिकांची उपस्थिती राहावी याकरिता गावोगावी शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांना हजर ठेवण्याची सक्ती केली.

या नागरिकांना आणण्यासाठी सर्व बस स्थानकांमधून बसेस या कार्यक्रमासाठी वापरल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली. याची पर्वा मात्र शासनाने किंवा प्रशासनाने केली नाही.

संगमनेर बस स्थानकातून 63 बसेस या कार्यक्रमासाठी देण्यात आल्या आणि बस स्थानक प्रशासनाने याबाबत फलक प्रकाशित केला की आम्ही गाड्या या कार्यक्रमाला पाठवत आहोत. याबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडाल्या.

शासनाच्या बेजबाबदारपणाचा एनएसयुआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, हैदर अली, वैष्णव मुर्तडक यांसह विविध पदाधिकार्‍यांनी तीव्र निषेध केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या