संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे आम्हाला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.
संगमनेर येथील शासन आपल्या दारी अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, सतीश कानवडे, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, वसंतराव देशमुख, आबासाहेब थोरात, कपिल पवार, सोमनाथ कानकाटे, भिमराज चतर उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात संगमनेर तालुक्यातील एक हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे, असे नमूद करून महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महिलांना देशपातळीवर आरक्षण देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासन आपल्या दारी योजनेत जिल्ह्यात जवळपास 24 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एक रूपयात पीक विमा सारखी सर्वसामान्य शेतकर्यांसाठी योजना आणली. यामुळे जिल्ह्यात 11 लाख 80 हजार शेतकर्यांनी पीक विमा काढला. राज्यात शासन आपल्या दारी योजनेत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
राज्यात ट्रिपल इंजिन सरकार काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. जनतेत जाऊन काम करणारे हे सरकार आहे. मागच्या सरकारच्या काळात कोणताही न्याय जनतेला मिळाला नाही. आता जनतेच्या मनातील सरकार असल्याने निर्णय तसे होत आहेत. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी अभिनंदन केले.
तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही. दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा असल्याने सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारची सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. निळवंडे धरणातून कलव्यांकरिता दि. 30 सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून डाव्या कालव्यांची काम प्रगतिपथावर आहेत. काही भागात ठेकेदारांनी काम जाणिवपूर्वक रखवडली असून त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमात वेगवेगळ्या विभागातील 25 लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेर मधील 1100 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात 23 टँकर व नगरपालिकेला 4 घंटागाड्यांचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 50 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.