शशिकांत शिंदे… शिक्षण, साहित्य, कवितेच्या प्रांतात रमणारं मानवी रसायन. कविता आणि ललित लेखनाची पुस्तके नावावर जमा असणारा आणि अनेक पुरस्कारांचा मानकरी. आजपासून ते खास देशदूत-सार्वमत डिजिटलच्या वाचकांसाठी ‘कवितेमागची कथा’ या ब्लॉग मालिकेतून दर शुक्रवारी भेटणार आहेत. कविता प्रसवताना असलेली तगमग, विचारांचे काहूर, फेर धरणारा तत्कालीन सभोवताल, अस्वस्थ आणि आनंदी क्षण पुन्हा उभे करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल. ‘माणूसपण गारठलयं’ने या ब्लॉग प्रवासाचा प्रारंभ. आवडल्यास 9860909179 या संपर्क क्रमांकावर त्यांना गाठता येईल…!
-डिजिटल टिम
तीस पस्तीस वर्षांपूर्वी कधीतरी आयुष्याच्या पानांवरचं संचित नवा शब्द होऊन मनात अंकुरलं. त्याची कविता झाली. आजही तो पागोळ अव्याहतपणे चालू आहे. हे संचित कसलं होतं? तर घरामध्ये लेखनाची अशी कुठलीच परंपरा नव्हती. वडील प्राथमिक शिक्षक. चाकोरीबद्ध असं त्यांचं आयुष्य. त्यांना वाचनाची आवड होती. गावातल्या सार्वजनिक वाचनालयात येणारी सगळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय ते घरी परतत नसत. वाचनालयातून परतायला उशीर झाला की आई त्यांना माघारी बोलावण्यासाठी मला धाडायची. वाचनात ते इतके गढून गेलेले असायचे की माझ्याकडे त्यांचं लक्षच नसायचं. मग मीही त्यांच्या पुढ्यात जाऊन निमूटपणे उभा रहायचो. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते एकेक ओळ वाचत असायचे. उशिराने माझ्याकडे बघितल्यावर हातातलं वाचून झालेलं पान हळूच माझ्या हातात सरकवायचे. चेहऱ्यावर मंद स्मित. त्यातून ‘वाच’ असा प्रेमळ आग्रह मला जाणवायचा. मग मीही त्यांच्याप्रमाणे ते पान समोर धरून पुटपुटत वाचायचो. बातम्यांचे न समजणारे विषय कळायचे नाहीत. परंतु वाचनाचा आनंद मिळायचा. घरी परतायला अंमळ उशीर व्हायचा. वडलांच्या बरोबरीने मग मीही आईची लाडिक बोलणी खायचो. आठदहा वर्षे वयाच्या त्या कोवळ्या मनावर वाचनाचा झालेला हा पहिला संस्कार. मग अशीच कधीतरी चांदोबा, किशोर ही मासिके हातात आली. आणि मग अलीबाबाची गुहाच उघडली. मिळेल ते वाचत गेलो. वाचन हा माझा परिपाठच झाला. वाचनाने समृद्ध होत गेलो. आजही काही वाचायला नसेल तर मी अस्वस्थ असतो. वाचनानेच माझ्यावर लेखनाचा संस्कार केला. आकाश काळ्याशार मेघांनी भरून यावं. वातावरण कमालीचं तणावपूर्ण. सगळं चिडीचूप. कुठेच कोलाहल नाही. निरव शांतता. आणि मग अचानक टपोऱ्या थेंबांच्या पालख्यांची गर्दी. सगळा आसमंत पहिल्या मृद्गंधाने भरून गेलेला. माझ्याही मनात कविता अशीच पहिल्या पावसासारखी दाटून आली. आयुष्याच्या पानावर वडलांनी रेखाटलेल्या वाचन संस्काराच्या संचिताला नवे धुमारे फुटले. आयुष्य कवितेच्या फळाफुलांनी डवरून गेलं.
पावसाची विविध रूपं लहानपणापासून पाहत आलोय. खेड्यात जन्मलो. खेड्यात वाढलो. त्यामुळे आपसूकच ‘पाऊस’ हा जिव्हाळ्याचा विषय. एवढा तेवढा पडणारा हा पाऊसच त्या ऋतूचक्राचा नियंता. आपलं जगणं मरणं त्या पावसाशीच जोडलेलं. तोच जर कमी अधिक प्रमाणात पडला तर? या ‘तर’नेच ‘माणूसपण गारठलंय’ ही कविता लिहून काढली.
सुखी समाधानी माणसांचं ते जग होतं. थोडंसं जरी पदरात पडलं तरी तृप्त होणारी माणसं होती. पूर्वी जेवढा पाऊस पडायचा तेवढाच आजही पडतो. आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे तो चिक्कार वाटायचा. माणसांच्या चेहऱ्यावर समाधान पसरायचं. खुश असायची माणसं. हसायची, आनंद करायची. छोट्या गोष्टीतून मोठा आनंद मिळवण्याचा तो काळ होता. हिरव्यागार रानाची पसरलेली साय सर्वांनाच सुखावह वाटायची. आता हव्यास वाढत चाललाय. सुख, समाधान, आनंद यांच्या व्याख्या बदलल्यात. मिळवणं केंव्हाच संपून गेलं. आता ओरबाडणं सुरू झालं आहे.
संपन्नतेचा काळ होता तो. संपन्नता म्हणजे हवं त्यापेक्षा जास्त मिळवून नुसतं साठवणं नव्हे. किंवा त्याचं प्रदर्शनही मांडणं नव्हे. मुठभर असलं तरी संपन्नता. आणि कणगी भरलेली असेल तर स्वर्ग दोन बोटेच उरलेला. आता जी ‘बाजार’ संस्कृती उदयाला आलीय तिचा लवलेशही नव्हता. देण्याघेण्याची संस्कृती होती. नुसती घेण्याची नव्हती. दूधदुभतं होतं. आणि ते देताना त्याला मोजमाप नव्हतं. घरांना उंबरा होता. आणि दारं सताड उघडी. त्यामुळे एकमेकांकडे येण्या जाण्यात सहजता होती. फळांचा, पालेभाज्यांचा वानवळा दिला जायचा. रोजच्या खानपानाला टाळून एखादा नवा पदार्थ घरात तयार झाला तर त्यालाही गल्लीभर पाय फुटायचे. मोप होतं म्हणून झुकतं माप होतं.
आई अंगणात अशी धान्य निवडत बसलेली. चिमण्या, कावळे बिनदिक्कतपणे अंगणात येऊन उतरायचे. आई सहजपणे मुठभर धान्य त्यांच्यासाठी उधळून द्यायची. खापराच्या भांड्यांमधून पाणी ठेवलेलं. तृप्तीचा ढेकर देत पक्षी भूर्रकन उडून जायचे. त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता टिपण्याजोगी असायची. पै-पाहुण्यांचा राबता असायचा. घरचं बाहेरचं सांभाळताना ती कधी तोंड टाकायची नाही. इतरांचं करताना ती आनंदी असायची. त्यातच तिला तिचा ईश्वर भेटायचा. पारमार्थिक आनंदातून ती आत्मिक आनंदाच्या सरोवरात आकंठ बुडून जायची.
सणवार होते. जत्रा-यात्रा होत्या. देवाची पालखी निघायची. भारूडं चालायची. नुसता जल्लोष असायचा. कानठळ्या बसवणारा धांगडधिंगा नसायचा. वाद्यांचा मेळ मंजूळ स्वरात असायचा. भजन, कीर्तनाला लोक गर्दी करायचे. रात्र रात्र ‘पार’ जागा असायचा. आता यातली सगळी गंमतच निघून गेलीय. दिवाळीतल्या फटाक्यांनी आवाजाचं आणि पर्यावरणाचं प्रदूषण वाढवलंय. गणपतीतल्या किंवा कुठल्याही मिरवणूकीतल्या डीजेंनी आवाजाच्या डेसिबलची मर्यादा केंव्हाच ओलांडलीय. उत्सव संपले आणि प्रत्येक गोष्टीला ‘उत्सवी’ स्वरूप प्राप्त झालय.
गाव, गावपण या संकल्पना बाद झाल्या. माणसं शहराकडे सैरावैरा पळू लागली. गावाकडे कुणी थांबायलाच तयार नाही. महात्मा गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या स्वप्नाला हरताळ फासला गेला. या सगळ्यांच्या तळाशी माणूस होता. त्याचं माणूसपण होतं. बदलत्या ग्राम जीवनाने त्यालाही संपवून टाकलं. खेड्यात राहून कष्ट करायची तयारी नाही. मग तो पावसाला दुषणं द्यायला लागला. पावसाच्या माथ्यावर खापर फोडून तो निःसंग झाला. शहरातल्या चकाकणाऱ्या गारगोट्यांनाच तो हिरे माणकं समजू लागला. गावपण हरवून बसला. हरवलेल्या गावपणामुळे माणूसपण नष्ट होत चालल्याची खंत आता कुणालाच वाटत नाही; ही दुखरी जाणीव मनाला सतत डागण्या देत राहते.
वर्तमानकाळाची भूतकाळाशी सांगड घालणारी ही कविता आहे. कालौघात हरवलेल्या गोष्टींचा शोध ती घेऊ पाहते. जे पवित्र, मंगल होतं परंतु; आता नष्ट होत चाललंय त्याचा लेखाजोखा ती मांडू पाहते. गाव, गावपण हरवू नये. माणूस, माणूसपण गारठू नये. हा एकच आशावाद त्या कवितेतून ऐकू यावा ही प्रार्थना मनाच्या गाभाऱ्यात धुपासारखी दरवळते आहे.
माणूसपण गारठलंय
पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा
हिरवंगार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा.
प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं
दूधदुभतं, तूप, लोणी
याला माप नसायचं.
पसाभरून धान्य तर
चिमणीच दारात टिपायची
पै-पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची.
सणवार जत्रांमधून
किती जल्लोष असायचा
भजन कीर्तन करीत गाव
आख्खी रात्र बसायचा.
एवढया तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय
गावपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय.
– शशिकांत शिंदे