कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब यांची एक सुंदर कविता आहे. “जीवन त्यांना कळले हो… ‘मी’पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.” लहानपणापासून ही कविता ऐकत आलोय. तिचा अमीट ठसा मनावर लख्ख उमटलेला. अर्थ समजत नसला तरी तिच्या नादमाधुर्याने मोहिनी घातलेली. वय वाढत गेलं तशी समज वाढत गेली. अर्थाचे अनेक पदर उलगडत गेले. आयुष्य नावाच्या सुंदर गोष्टीबद्दल औत्सुक्य वाढत गेलं. बोरकरांनी जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या मोगरीच्या कळ्या अलगदपणे ओंजळीत ठेऊन दिल्या. ओंजळ सुवासिक झाली. त्याने आयुष्याचा गाभाराही सुगंधीत झाला.
एकोणीसशे सत्त्यान्नव साली ‘निर्मम’ कविता लिहून झाली. त्याच वर्षीच्या ‘शब्दालय’च्या दिवाळी अंकात ती प्रसिद्धही झाली. त्यावेळी वयाने तीशीचा टप्पा गाठलेला होता. या वयात आयुष्य वेगवेगळी ओझी लादायला सुरूवात करतं. जबाबदारीच्या जाणीवेने जगण्याची लय बदलते. या संक्रमणातून जाताना बऱ्याचदा गोंधळ उडतो. माझीही अवस्था चारचौघांसारखी गोंधळलेली होती. तरीही ‘निर्मम’सारखी एक संपृक्त कविता माझ्याकडून लिहून झाली. खूप जगून झाल्यानंतर आयुष्याचा नेमका अर्थ उमगलेल्या गृहस्थाने लिहावं इतक्या सफाईने ती कशी लिहून झाली असेल? कुणाच्या प्रेरणेने शब्दांना कवितेची ‘निर्मम’ वाट दाखवली असेल?
माझे मामा मुंबई पोलीस दलात वरीष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांचं इंग्लिश, मराठी साहित्याचं वाचन अफाट होतं. दर्जेदार चित्रपट, नाटकांचं त्यांना वेड होतं. अभिजात कलांची त्यांना निसर्गतःच ओढ होती. दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीतला त्यांचा सहवास संपूच नये एवढा हवाहवासा वाटायचा. त्यांच्या बोलण्याला चिंतनाची डूब होती. शेक्सपिअरबद्दल त्यांना जेवढा आदर होता, तेवढेच रशियन कथालेखक अंतोन चेकॉव्हच्या कथांबद्दलही त्यांना कुतुहल होते. त्यांचं जगणं निर्विष होतं. जीवनाला समजून घेतल्यामुळे ते सदोदित आनंदी असायचे. मनोकायिक विकारांवर त्यांनी विजय मिळवलेला होता. त्यांचं ‘मी’पण पक्व फळासारखं सहजपणाने गळून पडलेलं होतं.
सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी श्रीधर अंभोरे यांनी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी पकडलेलं माझं आणि माझ्या कवितेचं बोट आजतागायत सोडलेलं नाही. कविमित्र प्रा. दादासाहेब कोतेच्या सजगतेमुळे सुरू झालेला कवितेचा प्रवास पुढे जाऊन अंभोरेंनी अधिक नेटका केला. त्यांच्या जगण्यातल्या साधेपणाने मला फार प्रभावित केलेलं आहे. मोहापासून कोसो मैल दूर असणारे अंभोरे विरागी वृत्तीचे आहेत. अहंकाराला गाडून माणूसपणाचं सुंदर चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे. विषयासक्तीचं मोरपीस उधाणलेल्या वाऱ्यावर अलगदपणे सोडून देणाऱ्या अंभोरेंचं आचरण विवेकशीलतेने ओतप्रोत भरलेलं आहे. ते त्यागी आहेत त्यामुळेच क्षमाशीलही आहेत. संतसज्जनांच्या सगळ्याच लक्षणांचा समुच्चय त्यांच्या निरागस व्यक्तिमत्त्वात एकवटलेला आहे. जगण्याचं सुरेल गाणं गुणगुणताना त्यांचंही ‘मी’पण पक्व फळासारखं सहजपणाने गळून पडलेलं आहे.
दोन हजार पाच साली माझा ‘शरणागताचे स्तोत्र’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. संग्रहातील ‘निर्मम’ कविता वाचून सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी कवितेवर सुंदर लेख लिहिला. त्यावेळी ते एका वर्तमानपत्राच्या रविवार आवृत्तीकरिता केवळ कवितेला वाहिलेले ‘अर्थ आणि अर्क’ या नावाचे सदर चालवायचे. लेखाचे शीर्षकच ‘तुला जीवन कळले आहे!’ असे मनोवेधक होते. ‘निर्मम’ कवितेचं त्यांनी केलेलं निरूपण असं होतं…
“निर्मम कवितेत शशिकांतचं चरित्र लपलेलं आहे. आत्यंतिक, निसर्गतः असणारा चांगुलपणा कुठल्याच लोभाच्या दावणीला बांधला जाऊ शकत नाही. तुकाराम गाथेचं मुखपृष्ठ कसं किंवा कुणी काढलं, हा प्रश्न अस्थानी गणला जातो. गाथेतल्या अंतरंगातला पांडुरंग आणि त्यातलं सार्वकालीन समाजशिक्षणच श्रेष्ठ ठरलं! अखेर मूळ प्रकृती फार महत्त्वाची गोष्ट असते. जन्म हा धनावर अवलंबून नसतो. मनाचे ऐश्वर्य कोणत्याही दौलतीपेक्षा, खनिजापेक्षा श्रेष्ठ असते. असे एक भव्य तत्वचिंतन शशिकांतच्या कवितेत आहे. सुंदर शिष्टाचाराचा मोठा गुणाकार करणारी ही शशिकांतची कविता!
‘निर्मम’ कविता मनात उतरून घेताना संत गाडगेबाबांचा स्मरण सहवास आपल्या मनातून झिरपत राहतो. ही कविता वाचताना महात्म्यांची मालिका दीपमाळेसारखी मनातून उजळून जाते. फार अलीकडे आलो की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या थोर सत्पुरूषांचे जीवन मनापुढे तरळते.
‘निर्मम’ कविता बहुआयामी आहे. सुंदर जगण्याचा सिद्धांत या कवितेच्या गर्भात हिऱ्यासारखा मुक्काम करून आहे. ईश्वरास जशी नावं आहेत; पण कुणालाच तो भेटल्याचा पुरावा नाही. तसं शशिकांतच्या ‘निर्मम’ रचनेचंही आहे. ज्यांना धन कळते त्यांना जीवन कळेलच हे सांगता येत नाही. जे प्रशंसेमध्ये ढळले अशांना सत्य कळू शकेलच याची हमी देता येत नाही. जी माणसं अहंकारानं सतत सुखावत गेली, अशा माणसांना वारकरी प्रकृती समजून घेताच येऊ शकत नाही. शशिकांतच्या या कवितेत आशयसौंदर्याची एक व्यंजना आहे. ही व्यंजनाच या कवितेच्या मूळ गाभास्थानी आहे. हे अवघे आशयसौंदर्य समजून घेण्यासाठी विवेकाच्या समाधीत उतरावे लागेल. इतकं स्थितप्रज्ञ व्हावं लागेल. संध्येच्या अशा प्रवाहाकडे प्रवासाला निघताना इतकं निर्मम, इतकं निष्कामच व्हावं लागेल. म्हणजे शशिकांत सोबत मग आपणास येता येईल! शशिकांत या अशा तुझ्या अर्थसगुण कवितेला वंदन!”
खूपच दीर्घ असा, कवितेची आणि माझीही प्रशंसा करणारा देशमुखांचा लेख वाचून मी सुखावलो. परंतु काही प्रश्नांनी मला हैराण केलं. देशमुख म्हणतात तसं मला जीवन कळलंय का? तर ‘नाही’ या उत्तराशी येऊन मी नकळत थांबतो. षड़रिपूंनी मला घेरलेलं. कुठल्याच विकारावर मला आजतागायत पूर्णतः मात करता आलेली नाही. मग कवितेत जे लिहिलं ते सगळं खोटं का? या प्रश्नव्युहात मी अडकत चाललेलो. तर देशमुखांनीच यातून सुटका केली. ‘कविता वाचताना महात्म्यांची मालिका दीपमाळेसारखी मनातून उजळत जाते’ या वाक्याने सगळे संभ्रम दूर केले.
श्रीधर अंभोरे आणि माझे मामा हे माझ्यासाठी महात्माच आहेत. मी आयुष्यभर त्यांच्यासारखं होण्याचाच प्रयत्न केला. आजही करतोच आहे. जेव्हा ते अशक्यप्राय वाटलं तेव्हा आयुष्य नावाच्या दीर्घांकात विरागी वृत्तीची वस्त्र चढवून अंभोरेंसारखं माणूसपणाचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. मामांच्या भूमिकेत शिरून जगणं निर्विष करण्याचा आटापिटा केला. ‘मी’पणाचं कवच सुटं झालं. अजून गळून पडलेलं नाही. परंतु त्या दोन महानुभावांच्या भूमिकेत शिरताना कवितेच्या माध्यमातून का होईना ‘निर्मम’ होता आलं हे मी माझं सौभाग्य समजतो.
निर्मम
माझ्या आयुष्याचे झाले
थोडे सोने थोडे लोह
नाही लोहात गुंतलो
नाही सोनियाचा मोह.
मानसन्मान पेलले
पेलताना स्थितप्रज्ञ
नाही चळली अहंता
विवेकाच्या समाधीत.
विषयाचे मोरपीस
फिरताना देहावर
नाही ढळला विवेक
नाही उघडीले द्वार.
आता संध्येच्या प्रवाही
बुडताना डोलकाठी
किती वाटते निर्मम
सोडताना साऱ्या गाठी.
-शशिकांत शिंदे,
(९८६०९०९१७९)