Sunday, May 26, 2024
Homeब्लॉगनवलाई...मातीसर्जनाच्या सोहळ्याला उधाण

नवलाई…मातीसर्जनाच्या सोहळ्याला उधाण

आभाळ एकाएकी भरून येतं. ढगांच्या नौबती झडायला लागतात. वीजांच्या अगणित शलाकांनी सारा आसमंत उजळून निघतो. किरमिजी, करड्या, पांढुरक्या ढगांच्या गालीच्यावरून मेघांची पालखी सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवते. सावकाशपणे पंख फैलावून झेपावणाऱ्या गरूडाप्रमाणे आकाश सावळ्या भूईला कवेत घेतं. स्त्रीसुलभ जाणीवांनी भूमीचं मार्दव तरारून येतं. साक्षात्कारी ऋण चहूबाजूंनी पालवतं. सृष्टीच्या गळ्यात हिरव्या सौभाग्याचं लेणं झळाळून उठतं.

जमिनीचं भाग्य उजळतं. चैतन्याच्या स्पर्शाने अवघा निसर्ग पुलकित होतो. पहाडांच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे प्रपात बेभान होतात. स्फटिकाच्या द्रावणात जीवनाची मूलद्रव्य मिसळून निर्झर झरू लागतात. घाटमाथ्यावरून दरीकडे धावणाऱ्या पावसाळी ओल्या ढगांचं सर्वदूर धुकं होऊन जातं. दरीतल्या गहनगूढ शांततेत डोळे हरवून जातात. सारं शिवार हिरवी मखमल पांघरतं. अन्नपूर्णेच्या पुजेला बसलेल्या रजःस्वला भूमीच्या संचिताला नवनिर्माणाच्या जाणीवांचे धुमारे फुटतात. आभाळाचं दान धरतीच्या कुशीत रूजून येतं. सृजनाचा काळ पाखरांच्या कंठातून स्वरबद्ध होतो. ऋतूचक्राचा अनुपम सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो.

- Advertisement -

मनात निनादणारा पाऊस माझ्या अनेक कवितांचा विषय झालेला आहे. त्याच्या असोशीने माझ्या चित्तवृत्ती नेहमीच बेधुंद ठेवलेल्या आहेत. तिकडे दूर कोसळत असला तरी इथे मनीची सारी इप्सिते त्याने पूर्ण केलेली आहेत. पावसाने जीवनाला असं मिठीत घेतलेलं. तो असतो दिगंताच्या पोकळीत. त्याला मनातल्या काहिलीची आर्त हाक स्पष्ट ऐकायला जाते. तो व्यंजनांना स्वर देतो. अक्षरांची बोलगाणी होतात. चांदण्या गढूळ, अभ्रांकित पाण्यात मनसोक्त न्हातात. वाफसा खाऊन पेरण्या उलगून जातात. तो आकाश असं अंगणात आणून ठेवतो. काळी माती कपाळाला लावून हिरवे, पोपटी राव्यांचे थवे सभोवार दृगोचर होतात. सर्जनी अलवार लाटा पृथ्वीच्या गर्भात शिरल्याने सगळी कारूण्यगाथा संपून जाते. डोईवर खराटे घेऊन उभी असणारी वनराई प्रफुल्लीत होते. हिरव्यागार रंगद्रव्याने काळाकभिन्न फत्तर मृदू मुलायम होऊन जातो. पक्षी अंग झाडतात. तुषारांची ओली नक्षी मातीवर क्षणभर थरारते. बासरीचे मंजूळ स्वर वाऱ्यावर पसरत जातात. त्या तालावर गुरेवासरे तुडुंब जोगतात. हिरव्यागार शेतातून नागमोडी पायवाटा सळसळतात. भविष्याचा वेध घेत शिवारात शिरतात. निढळाचा घाम सांडल्याने वंशवेल विस्तारत जाते. मुक्या ब्रह्मांडाला बोलायला भाग पाडणारा पाऊस, भिजवता भिजवता गाणं फुलवणारा पाऊस, अस्मानाचे हात निखळल्यागत धुँवाधार कोसळणारा पाऊस, जीवाचा जीवलग, सखा. किती विलोभनीय रूपं ! सळसळत्या चैतन्याने निसर्गाचे चक्र फिरवताना मेघांचा गहिवर होऊन सृष्टीच्या खांद्यावर उतरतो. पाऊस जीवनाला हिरवागार टवटवीत आशय प्रदान करतो !

‘नवलाई’ कवितेत हा सगळा आशय भरून उरलेला आहे. अगदी सहजगत्या लिहून झालेली ही कविता तिच्या चिमुकल्या अस्तित्वामुळे बाजूलाच पडून राहिली. नियतकालिकांसाठी कविता धाडताना तिचा कधीच विचार केला नाही. ती थेट दोन हजार चौदा साली आलेल्या ‘ताटातुटीचे वर्तमान’ या कवितासंग्रहात समाविष्ट झाली. तिची गुणवत्ता, तिची महत्ता कविमित्र केशव सखाराम देशमुखने हेरली. डॉ. कुमार सप्तर्षींच्या संपादनाखाली निघणाऱ्या ‘सत्याग्रही विचारधारा’च्या अ़ॉगस्ट दोन हजार सोळाच्या अंकात ‘कवितांगण’ सदरात केशवने ‘नवलाई’ कवितेवर भाष्य करताना ‘मातीसर्जनाचा सोहळा’ असा गौरवपूर्ण उल्लेख करून दीर्घ लेख लिहिला. त्या लेखाचा आशय थोडक्यात असा होता–

“शशिकांत शिंदे हे विशेषतः एकोणीसशे नव्वदपासून मराठीत जी एक ग्रामीण पिढी महत्त्वाची कविता लिहिते, त्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे महत्वाचे व गुणवान कवी आहेत. महत्वाच्या मराठी नियतकालिकांतून व दिवाळी अंकातून शशिकांतची कविता वाचकांवर भुरळ टाकूनच कायम घर करत आली. शशिकांतच्या कवितेचा स्वभाव संमिश्र स्वरूपाचा. शेतीच्या एकूण अविष्काराकडे हा कवी सात्विकतेने, सुसंस्कृतपणे बघतो. त्याच्या कवितेचा कंद तसा रोखठोक ग्रामवास्तव साकार करणारा नाही. उलट रेखीव निसर्गचित्रे रेखांकित करण्याचा त्याच्या कवितेचा छंद श्रीमंत आहे. हा कवी पावसाची गाणीही जणू अप्रतिम लिहितो. सृष्टीच्या सर्जनाचा सांगितिक आलेखही त्याच्या कवितांमधून मनमोर झालेला वाचायला मिळतो. परंपरेच्या सान्निध्यातील शेत, चैतन्य भरविणारा निसर्ग, शिवारातील हंगामाची वर्णनं अथवा पीकपाणी, ऊनवारा, सुजलाम स्थिती याबद्दल शशिकांत कवितेत मजा आणतो, बहार आणतो. निसर्गचक्राच्या एकूण स्थितीकडे पाहताना शशिकांतची सौंदर्यदृष्टी वाचकमनांवर गारूड केल्याशिवाय राहात नाही. शेतीची संस्कृती आणि तेथील माणसांची वर्तनशैली यांचाही नेमका बोध या कविला कळालेला आहे. कमी शब्दांत अधिक सांगणारा त्याच्या कवितेचा पिंड काव्यदृष्ट्या न्याय्य आणि आशयदृष्ट्या महत्वाचा मानला पाहिजे. प्रसिद्धीसाठी लटापटी करण्याचा या कवीचा छंद नसल्यामुळे आणि स्वतःच्या या प्रतिभाबलावर त्याची कसोटीची निष्ठा असल्यामुळे त्याने लिहिण्याकडे व अर्थसमृद्धीकडे अधिक ध्यान दिले. यातून एक भौतिक फटका त्याला असा बसला की, त्याची गुणविशेषता असूनही फार नीट नोंद काव्यविमर्श परंपरेत घेतली गेली नाही. दर्जा असूनही पुरस्कारव्यवस्थेचा फटका त्याला बसला. पण मुळातच ‘खरा कवी’ असल्यामुळे शशिकांतने त्याची पर्वा केली नाही. ना. धों. महानोर यांच्यासारख्या प्रतिभासमृद्ध ज्येष्ठ कविवर्यांनी शशिकांतच्या पाठीवर मात्र सतत आश्वासक हात ठेवला.

शशिकांतने पावसाचे फार मोहक चित्र ‘नवलाई’ कवितेत उभे केलं आहे. भरून आलेल्या आभाळाची आणि वीजांच्या लखलखाटाची जी नवलाई हा कवी रेखाटतो, त्यातला प्रतिमांचा सुंदर अविष्कार मनाचा कब्जा घेऊन टाकणारा आहे. ‘हा पाऊस शाई होऊन धरणीवर काही लिहितो आहे’, यातील सर्जक सौंदर्यदृष्टी चित्तवेधी आहे. पावसानंतर पीक बहरते. शेतं हिरवी होतात. साऱ्या सृष्टीला आमोद होतो. पिकांचे वर्णन करताना ‘हिरवी अक्षरे उगवली’ अशी शशिकांतने प्रतिमांची जुडी वाचकांपुढे ठेवली. ती पण चित्तवेधक आहे. मेघगर्जनेसह येणारा पाऊस तसा अगत्यशील आहे, तसाच हा पाऊस सृष्टीला सत्यम, शिवमसुंदरम करणारा आहे. ज्यामुळे होणारा आनंद हा शब्दातीत आहे; पण कवीनं तो शब्दांकित करून ठेवलाय. शशिकांतच्या प्रतिभेचं लावण्यच नेमकं इथे आहे. पावसाचे शाई बनून धरणीवर लिहिणे किंवा हिरवी अक्षरे उगवणे किंवा माती कविता होणे किंवा हिरवाई म्हणजे सांडलेली जणू पुण्याई या एकूणएक प्रतिमांमधून शशिकांतच्या कवितेचं लावण्य अधिकच दिमाखदार होत गेलेले आहे. पावसावर मराठी व जगात लक्षावधी कविता लिहिल्या गेल्या आहेत. ‘पाऊस’ हा कवितेला उद्युक्त करणाराच सृष्टिविषय आहे. प्रतिभा फुलवणारे सगळे घटक या पावसांत कायम वसलेले असतात. शशिकांतवरही या पावसानं जी खोल मोहिनी घातली, त्या मोहिनीचीच ‘नवलाई’ ही कविता झालीय.”

दुर्लक्षित राहिलेल्या या कवितेच्या झोळीत केशवने नवल करावं एवढं भरभरून ओतलं. निराश झालो, अस्वस्थ वाटलं की कवितेचं पुस्तक उघडून बसतो. जराशा शैथिल्यानेच लिहिलेल्या ‘नवलाई’ कवितेवर डोळे खिळून राहतात. नवलाईच्या प्रांगणात मातीसर्जनाच्या सोहळ्याला उधाण येतं…

नवलाई

हे भरून आले मेघ

रेखीत विजेची रेघ.

पाऊस जाहला शाई

धरणीवर लिहितो काही.

अक्षरे उगवली हिरवी

मातीची कविता बरवी.

ही अथांगशी हिरवाई

सांडली जशी पुण्याई.

ही सृष्टीची नवलाई

जगण्याची देते ग्वाही.

_शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या