प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ गाण्यामुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झालेली शेफाली जरीवाला हिचं 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेफाली जरीवालाची प्रकृती अचानक खालावली, त्यानंतर तिचे पती पराग त्यांना तातडीने अंधेरी येथील कूपर रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं.
चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेफालीच्या निधनाची पुष्टी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफालीला प्रथम बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेवर रुग्णालयातील डॉक्टर सुशांत यांनीही दुजोरा दिला. मात्र, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विजय लुल्ला यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
शेफालीच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे कारण तिने मृत्यूपूर्वी अवघ्या ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. त्यामुळे तिच्या अचानक निधनाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. तिच्या प्रकृतीबाबत याआधी कुठलाही गंभीर आजार किंवा तक्रार समोर आलेली नव्हती.
१९ डिसेंबर १९८२ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे जन्मलेली शेफाली जरीवाला हिने २००२ मध्ये आलेल्या ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या गाण्यातील तिचं ग्लॅमरस लूक आणि नृत्य यामुळे ती रातोरात चर्चेत आली.
नंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. याशिवाय ती ‘बिग बॉस 13’, ‘नच बलिए’ अशा लोकप्रिय रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांसमोर आली. तिच्या सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि आत्मविश्वासामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती.
शेफालीच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांवर तिच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी तिच्या आठवणी शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंतांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
प्रत्येक पिढीत एखादी अशी कलाकार असते जी आपल्या एका कामगिरीने इतिहासात नोंदवली जाते. शेफालीसाठी ‘कांटा लगा’ हे गाणं तिचं आयकॉनिक ओळख ठरलं. त्यानंतर बॉलिवूड आणि रिअॅलिटी टीव्हीमध्ये तिचं नाव अनेकदा चर्चेत राहिलं.





