मुंबई | Mumbai
अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘शहजादा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेले अनेक दिवस त्या चित्रपटाचं विविध शहरांमध्ये जाऊन जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अखेर हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
याच दरम्यान कार्तिक आर्यनने शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्याच्या नवीन रिलीज झालेल्या ‘शेहजादा’ चित्रपटासाठी बाप्पांचे आशीर्वाद घेतले. परंतु यावेळी अभिनेता कायदेशीर अडचणीत सापडला. कार्तिकने त्याची लक्झरी ब्लॅक लॅम्बोर्गिनी गाडी चुकीच्या बाजूला पार्क केल्याबद्दल त्याला चालान मिळाले.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या हटके स्टाइलमध्ये ट्वीट करत कार्तिकला चालान का भरावे लागले याचे कारण सांगितले. त्यांनी कार्तिकच्याच एका संवादाची स्टाइल वापरत लिहिले की, ‘प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा आहे की गाडी चुकीच्या जागी पार्क करण्यात आली होती. ‘शहजादा’ ट्राफिकचे नियम मोडू शकतो अशी ‘भूल’ करू नका.’ #RulesAajKalAndForever असा हॅशटॅगही मुंबई पोलिसांनी वापरला.
प्रदर्शनाच्या आधी कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाची खूप चर्चा होती. युट्यूब व्हूजच्या बाबतीत या चित्रपटाच्या ट्रेलरने ‘पठाण’च्या ट्रेलरने ‘पठाण’लाही मागे टाकलं होतं. त्यामुळे हा चित्रपटगृहात चांगली कामगिरी करेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र तसं झालेलं नाही. त्याचप्रमाणे हा चित्रपट पाहून अनेकांची निराशा झाली आहे. या चित्रपटाबद्दल आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
‘शहजादा’ हा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठापुरामुलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने केले आहे. कार्तिक स्वतः या चित्रपटाचा निर्माता आहे.