अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेंडी (ता. नगर) शिवारातील बायपास रस्त्यावर खंडोबा मंदिरा जवळील एका वस्तीवर सोमवारी पहाटे सहा ते सात दरोडेखोरांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला. लाकडी दांडके, लोखंडी रॉड व चाकूने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. सोन्या- चांदीचे दागिने, रोकड असा 78 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी अशोक लहानू कजबे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कजबे यांच्यासह त्यांचे वडिल लहानू कसबे, आई जनाबाई कसबे, जखमी झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शेंडी बायपास रस्त्यावर खंडोबा मंदिराजवळ कजबे यांची वस्ती आहे. सोमवारी पहाटे एकच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी कजबे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी अशोक कजबे, त्यांचे वडिल लहानू कजबे व आई जनाबाई कजबे यांना लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली. धारदार चाकूने मारण्याची धमकी देत दमदाटी केली. फिर्यादी आई जनाबाई, पत्नी व मुलीच्या अंगावरील सोन्याचे टॉप्स व वेल (7 ग्रॅम), मंगळसूत्र (2.5 ग्रॅम), चांदीचे जोडवे (सात भार), सोन्याची रिंग (1.5 ग्रॅम), मंगळसूत्र (5 ग्रॅम), कानातील कुडके (2 ग्रॅम) व दोन हजार 600 रूपयांची रोकड असा 78 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोर पसार झाल्यानंतर कजबे यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.