दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी शहरालगतच निळवंडी रोडवरील जाधव वस्ती वर पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने दिंडोरीत घबराटीचे वातावरण पसरले असून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी दिंडोरीतून होत आहे.
सध्या गुलाबी थंडीची चाहुल लागताच इतर ठिकाणाहुन मेंढपाळ चार्यासाठी भटकंती करत करत दिंडोरी तालुक्यात येत आहे. तर काही ठिकाणी हे मेंढपाळ वाडीवस्ती परिसर बघुन शेतकर्यांच्या रिकाम्या झालेल्या शेतामध्ये शेतकर्यांच्या सांगण्यानुसार मेंढ्या शेतामध्ये बसवत आहे. यानुसार दिंडोरी शहरातील जाधव वस्तीवरील प्रकाश लक्ष्मण जाधव यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये मेंढ्या बसवलेल्या होत्या. दिंडोरी येथील शेतकरी प्रकाश लक्ष्मण जाधव यांनी परिसरात असलेले मेंढपाल आबा ठेलारी यांना पाचारण करुन आपल्या मालकीच्या गट नं. 981/02 या क्षेत्रामध्ये मेंढपाळ्यांना शेतातमध्ये मेंढ्या बसवण्यास सांगितले. त्यानुसार मेंढ्या बसवण्यात आल्या. सायंकाळी ठेलारी कुटूंब झोपल्यानंतर पहाटी 3 वाजेच्या सुमारास मेंढ्या दिशेने बिबट्या तेथे येवून मेंढपाल आबा ठेलारी (35) या मेंढपाळावर हल्ला करुन जखमी केले.
यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. प्रकाश जाधव यांना ठेलारी यांचा आवाज आल्याने ते घटनास्थळी शेताकडे गेले असता तर ठेलारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले. तेथे तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्यावर सध्या उपचार करण्यात आली असून ते सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ दुधेरीया यांनी दिली.वन अधिकारी अशोक काळे यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयात जखमीची भेट घेतली.तसेच यावेळी वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. दिंडोरी शहरालगत मुरकूटे वस्ती, जाधव वस्ती, कोलवन नदी परिसर, धामण नदी परिसर, विंध्यावासिनी मंदिर परिसर आदी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शक्यतो जिथे बिबट्याचा वावर आहे तेथे मेंढपाळ किंवा अन्य कोणी वास्तव्यास आल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना माहीती देवून सावध करणे आवश्यक आहे. वास्तव्याच्या ठिकाणी आजुबाजुला प्रकाशाची व्यवस्था करावी. संबंधित मेंढपाळाची जिल्हा रूग्णालयात मी स्वतः भेट घेतली असुन संबंधित व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले आहे. ती व्यक्ती सुखरूप देखील आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येतील.
– अशोक काळे, वन अधिकारी, दिंडोरी
दिंडोरी शहरालगतच बिबट्या हल्ला करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यांची दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरा लावून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना बिबट्याचा दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी दिंडोरी करांच्या वतीने करतो.
– नितीन धिंदळे, सामाजिक कार्यकर्ते