राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे शेतकरी प्रथम प्रकल्पांर्तगत राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे, कणगर, तांभेरे, कानडगाव येथील ज्वारी व तूर पीक प्रात्याक्षिकांना विद्यापीठातील शास्त्रज्ञ व तज्ञ आधिकार्यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे शेतकरी प्रथम प्रकल्प 2016-17 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी मंजूर करण्यात आला. सुरुवातीला हा प्रकल्प राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे व कनगर या गावांमध्ये राबविला जात होता. सन 2021 पासून तांभेरे व कानडगाव या गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी.के. ससाणे व प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ.पंडित खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धती मॉडेल शेतकर्यांच्या शेतावर राबविले जाते. या प्रकल्पामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तूर, रब्बी हंगामामध्ये ज्वारी व हरभरा तसेच डाळिंब उत्पादन, परसबागेतील कुक्कुटपालन, शेळीपालन, मुरघास व गांडूळ खत निर्मिती इत्यादी घटकांचा समावेश केला गेला आहे. खरीप हंगाम 2024-25 मध्ये सोयाबीनचे 50 एकर क्षेत्रावर तर तूर पिकाचे 25 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेतली गेली तसेच रब्बीमध्ये ज्वारी पिकाचे 50 एकर क्षेत्रावर ही प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे, प्रकल्प प्रमुख डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ व डॉ. भगवान देशमुख यांनी ज्वारी व तूर पीक प्रात्यक्षिकांना भेटी दिल्या.
यामध्ये चिंचविहिरेतील सहभागी शेतकरी अभिजीत गिते, निर्मला गाढे, कणगर गावातील सहभागी शेतकरी प्रविण गाढे, तांभेरे गावातील सुरेश गागरे, तुकाराम निमसे, भाऊसाहेब गागरे व कानडगावातील सहभागी शेतकरी पाडुरंग गागरे, मदन गागरे, नाना महाराज गागरे यांच्या पीक प्रात्यक्षिकांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.ज्वारीचे फुले रेवती व फुले वसुधा तसेच तुरीचे फुले तृप्ती या वाणांचे पीक प्रात्यक्षिके अत्यंत चांगल्या प्रकारे सहभागी शेतकर्यांद्वारे राबविली जात आहेत. सदर प्रात्यक्षिक भेटीचे नियोजन प्रकल्पाचे संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक राहुल कोर्हाळे आणि किरण मगर यांनी परिश्रम घेतले.