Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकमराठ्यांना नाही तर शेतकऱ्यांना आरक्षण द्या; शेतकरी संघर्ष समितीचे तहसीलसमोर आमरण उपोषण

मराठ्यांना नाही तर शेतकऱ्यांना आरक्षण द्या; शेतकरी संघर्ष समितीचे तहसीलसमोर आमरण उपोषण

सिन्नर | प्रतिनिधी

राज्यभरातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाचे रान करत आहेत. समाजबांधवांनाही आरक्षण मिळेल अशी आशा लागून आहे. मात्र, सरकारकडून यासाठी कुठलेही सकारात्मक पाऊल पडताना दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर सरकारने शेतकर्‍यांना आरक्षण देऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी केली.

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येथील शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून (दि.23) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अनेक वर्षांपासून शासनाला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात यश मिळत नाही.

मात्र, आता राज्यभरातील मराठा बांधव एकवटला असून आरक्षण मिळाल्याशिवाय समाजबांधव शांत बसणार नाही. त्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाजाला आता लवकरच आरक्षण मिळेल अशी आहे. मात्र, सरकारकडून कुठलेही सकारात्मक हालचाली होताना दिसून येत नाही.

त्याच पार्श्वभुमिवर येथील शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तहसीलसमोर उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सरकारने शेतकर्‍यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली.

ज्याप्रकारे सुतार काम करणारे सुतार, कुंभार काम करणारे कुंभार, माळी काम करणारे माळी, मजुरी व व्यापारी करणारे वंजारी, चतुर्थ श्रेणी व मजुरी करणारे दलित, वनमजुरी करणारे आदिवासी, तेल काढणारे तेली अशा व्यवसायावरुन समाजाला आरक्षण मिळाले आहे. त्याचप्रमाणे शेती व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याला सरकारने आरक्षण मिळाले आहे. सततचा दुष्काळ, बेभरवशाचा पाऊस, पिकाला हमी भाव नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले टक्के मिळूनही आरक्षणाअभावी व मोठमोठ्या प्रवेश फी मुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर शेतकर्‍यांना आरक्षण द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी यावेळी केली. शिंदे यांच्यासह गोपाळ गायकर, शिवाजी गुंजाळ, कचरु कुंदे, अर्जुन घोरपडे, दत्तु हरळे, चिंधु गुंजाळ, पुंजाजी शेळके, रामदास शिंदे, अनिल शेळके, उत्तम शिंदे सोनारीकर, रंगनाथ शेळके, सोमनाथ कांगणे उपोषणाला बसले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या