अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत शेवगाव आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण 22 लाख 55 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांची दोन पथके तयार करून अवैध वाळू वाहतूक करणार्यांविरूध्द कारवाईसाठी रवाना केली. या पथकांनी 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी शेवगाव व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती संकलित केली. त्यानंतर दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली.
शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत वैजीनाथ रमेश काळे (वय 31, रा. मुंगी) याच्यासह विठ्ठल सर्जेराव गव्हाणे (रा. मुंगी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सात लाख 35 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विठ्ठल गव्हाणे पसार आहे. दुसरी कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या कारवाईत अनिल रामदास गायकवाड (वय 39, रा. मुर्शीदपूर), याच्यासह सोनू ऊर्फ सागर पाले (रा. साईधाम पाटी, कोपरगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी 15 लाख 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोनू ऊर्फ सागर पाले पसार आहे.




