शेवगाव |तालुका प्रतिनिधी|Shevgaon
येथील राजयोग हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून तीन बांगलादेशी मुलींना ताब्यात घेतले असून सहा जणांविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) केली.
सामाजिक संस्था फ्रिडम फर्म यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, शेवगाव-गेवराई रस्त्यावरील राजयोग हॉटेलमध्ये काही मुलींना नोकरीचे आमिष दाखवून ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. त्यानंतर राजयोग हॉटेलवर छापा टाकण्यात आला.
छाप्यामध्ये तीन बांगलादेशी मुलींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी कृष्णा झिरपे (वय 25, रा. चापडगाव रस्ता, कोळगाव, ता. शेवगाव), प्रतिक रांधवने (वय 28, रा. माळीवाडा, शेवगाव), हॉटेलचा मालक बाबासाहेब अंधारे (रा. शेवगाव), अजिंक्य अंधारे (रा. शिवाजीनगर, शेवगाव), अमोल पठाडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेवासा) व अमर मारूती ढाकणे (रा. हसनापूर, शेवगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध मार्गाने आणले भारतात
संशयित आरोपींनी एजंटमार्फत या मुलींना बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात आणले होते. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून लॉजमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर जबरदस्तीने ग्राहकांकडून अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता, असे तपासात आढळून आले आहे.





