Sunday, October 4, 2026
Homeनगरशेवगाव पोलिसांची मोठी कारवाई : पिस्तुल आणि स्कॉर्पिओसह आरोपीला अटक; २० लाखांचा...

शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई : पिस्तुल आणि स्कॉर्पिओसह आरोपीला अटक; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव । तालुका प्रतिनिधी

शेवगाव पोलिसांनी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि एक महागडी स्कॉर्पिओ गाडी असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, आखेगाव रोडवरून एक विनानंबर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी शेवगावच्या दिशेने येत आहे. विशेष म्हणजे, या गाडीतील व्यक्तीकडे बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आखेगाव रोडवरील ‘हॉटेल रिलॅक्स इन’ परिसरात सापळा रचला. रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली. पोलिसांनी ही गाडी अडवून तिची कसून तपासणी केली असता, गाडीमध्ये जावेद मुनिर सय्यद (वय २७, राहणार भापकर वस्ती, आखेगाव रोड, शेवगाव) हा तरुण आढळून आला. पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धक्कादायक वस्तू सापडल्या.

आरोपीच्या झडतीमध्ये पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तुल, एक मॅग्झीन आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. या शस्त्रांबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपयांचे पिस्तुल, ५०० रुपयांची मॅग्झीन, १०० रुपयांची काडतुसे, ८० हजार आणि २५ हजार रुपयांचे दोन सॅमसंग मोबाईल फोन आणि १९ लाख रुपये किमतीची विनानंबर स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल नामदेव खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी जावेद सय्यद याला बेड्या ठोकल्या असून, या शस्त्रांचा वापर तो कशासाठी करणार होता किंवा हे शस्त्र त्याने कुठून आणले, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर करत आहेत.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात आजीनाथ कोठाळे, रामहरी खेडकर, चंद्रकांत कुसारे, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल खेडकर, ईश्वर बेरड, राजू बडे, नकुल फकले, किशोर पालवे, होमगार्ड प्रकाश गरड आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुड्डू यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...