Thursday, May 7, 2026
HomeनगरShare Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ५७ लाखांची फसवणूक; फरार...

Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ५७ लाखांची फसवणूक; फरार आरोपीला संभाजीनगरमधून अटक

शेवगाव (तालुका प्रतिनिधी)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५७ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. लक्ष्मण राजू पातकळ असे या आरोपीचे नाव असून, जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात सापळा लावून ही कारवाई केली.

- Advertisement -

या प्रकरणातील फिर्यादी दामोधर लक्ष्मण विघ्ने (रा. मंगरुळ बुद्रुक, ता. शेवगाव) यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी लक्ष्मण पातकळ याने ‘दत्तकृपा ट्रेडिंग’ नावाने संस्था चालवत असल्याचे सांगून विघ्ने यांचा विश्वास संपादन केला होता. त्याने “तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्या बदल्यात तुम्हाला दरमहा ८ ते १० टक्के परतावा मिळेल,” असे प्रलोभन दाखवले होते.

या आमिषाला बळी पडून विघ्ने यांनी एकूण ५७ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काही काळानंतर पातकळ याने ठरलेला परतावा दिला नाहीच, शिवाय मुद्दल रक्कमही परत देण्यास टाळाटाळ केली. गुंतवणूकदारांचे पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून त्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पातकळ फरार झाला होता.

अनेक दिवस तपास करूनही आरोपी हाती लागत नसल्याने फिर्यादी विघ्ने यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे अटकेची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासादरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार यांना तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांमार्फत आरोपी हा संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरुड फाटा येथे असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलीस हवालदार गणेश कावरे, आव्हाड आणि चालक फडतडे यांचा समावेश होता. या पथकाने चिकलठाणा परिसरात सापळा लावून आरोपी लक्ष्मण पातकळ याला शिताफीने ताब्यात घेतले.

अटकेनंतर आरोपीला शेवगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेता, माननीय न्यायालयाने आरोपी लक्ष्मण पातकळ याला शुक्रवार, २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस फसवणुकीतील रक्कमेचा शोध घेणार असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचाही तपास केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ मे २०२६ – तामिळनाडूचा नवा जननायक

0
तामिळनाडूच्या राजकारणाने गेल्या सहा दशकांपासून एक ठराविक साचा जोपासला होता. १९६७ नंतर या राज्याने ‘द्रविडीयन’ विचारधारेच्या पलीकडे जाऊन कधी विचार केला नाही. अण्णा दुराई,...