Sunday, October 6, 2024
Homeनगरपक्षाने दखल न घेतल्यास भाजपची जागा हातून जाईल

पक्षाने दखल न घेतल्यास भाजपची जागा हातून जाईल

अरूण मुंडे यांचा शेवगावच्या निर्धार मेळाव्यात इशारा || राजळे यांच्यावर नाव न घेता टीका

शेवगाव |तालुका/ शहर प्रतिनिधी| Shevgav

जनतेसाठी भांडणार्‍या कार्यकर्त्यांना संपवण्याचे उद्योग मतदारसंघातील प्रस्थापित करत आहेत. नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याच काम सुरू आहे. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याची दखल पक्षालाही घ्यावी लागेल, अन्यथा भाजपची ही जागा हातातून जाईल असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात दिली. मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे झाला.

- Advertisement -

अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य होते. यावेळी मुंडे यांनी आ. मोनिका राजळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. ज्यांची गल्लीत निवडून येण्याची ऐपत नाही अशांना तालुका सांभाळायला दिला आहे. त्यांना विरोध करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. त्यामुळे तुम्ही परत आमदार होणार नाहीत. गावच्या सरपंचापासून जिल्हा परिषद, कारखाना, मार्केट कमिटी व आमदारकी अशी सर्व पदे तुम्हाला घरातच पाहिजेत. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. परंतु 2014 सालापासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले. आता त्यांनी थांबावे व आम्हाला आशीर्वाद द्यावा असे ते म्हणाले. आम्ही भाजप विरोधात लढणार नाहीत असे ते सांगतात.

मात्र भाजप सरकारकडून कोटी रुपये कारखान्यांसाठी आणले ते यांना चालतात का अशा शब्दात मुंडे यांनी घुले यांच्यावर टीका केली. भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, 25 ते 30 वर्षांपासून भाजपचे काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मतदार संघातील घराणेशाहीने 50 वर्ष जनतेला फसवले पक्षाने आदेश दिला तर उमेदवारी करू अन्यथा अपक्ष उभे राहण्याचेही तयारी आहे. यावेळी बाळासाहेब सोनवणे, संजय मरकड, सतीश मगर, आत्माराम कुंडकर, शब्बीर शेख, संजय टाकळकर, विलास फाटके, रमेश कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी अमोल सागडे, नगरसेवक अजय भारस्कर, अंकुश कुसळकर विकास फलके, दिगंबर काथवटे, गणेश गर्गे, भूषण देशमुख, भीमराव फुंदे, उदय मुंडे, सालार शेख, शितल केदार उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब कोळगे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी तर आभार गणेश कराड यांनी मानले.

पक्ष नेतृत्वाचा विश्वास असल्याने उमेदवारी चिंता नाही

आ. राजळे : तोंडोळी येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह पक्षनेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे उमेदवारीची चिंता करू नका. विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार समजून भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन आ. मोनिका राजळे यांनी केले. तोंडोळी येथील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्रावणनिमित्त राजळे कुटुंबियाच्या वतीने 30 वर्षापासुन दरवर्षी महापूजा व अभिषेक करून स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही राहुल राजळे यांनी महापुजा करून अभिषेक केला. त्यानंतर मेळाव्यात आ. राजळे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी हभप गणपत महाराज होते तर भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शहराध्यक्ष बंडू बोरुडे, रामकिस काकडे, काकासाहेब सातपुते, विष्णुपंत अकोलकर, भगवान आव्हाड, धनंजय बडे, संदिप पठाडे, चारुदत्त वाघ, नारायण पालवे, मुकुंद गर्जे, संजय किर्तने, महेश बोरुडे, वैभव आंधळे, भगवान साठे, शुभम गाडे, सचिन वायकर, मंगल कोकाटे, ज्योती शर्मा उपस्थित होते. आ. राजळे म्हणाल्या, दहा वर्षापासून केंद्रात व राज्यात भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणुन विकासाच्या माध्यामातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न केला. पक्षाशी प्रामाणिक राहत सर्व उपक्रम राबविले. जातीपातीचे राजकारणा केले नाही.

मनामध्ये राग कधी धरला नाही, प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांचे समाधान झाले नाही, त्यांचेही आगामी काळात नक्कीच समाधान करू. विरोधकांकडे ठोस मुद्दाच नसल्याने ते खोटे अरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. परंतु जनता सुज्ञ आहेत. प्रास्तविक बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे यांनी तर आभार सभापती संदिप पठाडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या