अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भावकीतील जुन्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू व मुलगा गंभीर जखमी झालेल्या प्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी तीन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
जालिंदर आसाराम गायके (वय 50), बाळासाहेब आसाराम गायके (वय 46) आणि तुकाराम ज्ञानदेव गायके (वय 42, तिघेही रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. फिर्यादी नानासाहेब बाळासाहेब गायके, त्यांचे वडिल बाळासाहेब अश्रू गायके व आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद होते. दिनांक 4 मे 2019 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे वडील आणि काकडे मिस्त्री हे दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना चापडगाव माथा (ता. शेवगाव) शिवारात भावकीतील आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली.
या वेळी जालिंदर गायके याने हातातील कुर्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला, तर इतर आरोपींनी लोखंडी गज व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. फिर्यादीचे वडील बाळासाहेब अश्रू गायके यांना डोक्यात जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. जखमींना प्रथम पाथर्डी ग्रामीण रूग्णालयात, त्यानंतर गंभीर अवस्थेमुळे नगर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. रूग्णालयाकडून प्राप्त एमएलसीनुसार तोफखाना पोलीस ठाण्याने जखमीचा जबाब नोंदवून पुढील तपासासाठी शेवगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात फिर्यादीचे वडिल बाळासाहेब अश्रू गायके यांचा मृत्यू झाला.
संपूर्ण तपासानंतर तपासी अधिकार्यांनी दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान एकूण सात आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी दोन आरोपी विधी संघर्षित बालक असल्याने त्यांच्याविरोधात स्वतंत्र खटला सुरू आहे, तर दोन आरोपींना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या खटल्यात जखमी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे, कागदोपत्री व तोंडी पुरावे तसेच रासायनिक विश्लेषण अहवाल महत्त्वाचे ठरले. अभियोजन पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अर्जुन बी. पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पैरवी अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय बेरड व शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अशोक बेळगे यांनी सहकार्य केले.





