Saturday, May 4, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यात लम्पीने पाच जनावरांचा बळी

शेवगाव तालुक्यात लम्पीने पाच जनावरांचा बळी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात जनावरांच्या लंपी सदृश आजाराची संसर्गजन्य साथ वाढत असून या आजाराने आतापर्यंत 5 जनावरांचा बळी घेतल्याने शेतकरी पशुपालकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. लसीकरण झालेल्या जनावरांतही लंपी सदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडत चालली आहे.

- Advertisement -

तालुक्यात गायसंवर्गातील जनावरांची संख्या 75 हजारांच्या आसपास असून तालुका पशुसंवर्धन विभागाकडे आतापर्यंत लसीचे 71 हजार डोस उपलब्ध झाले असून आज अखेर 66 हजार 348 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चारुदत्त असलकर यांनी दिली. तालुक्यात आत्तापर्यंत 143 जनावरे बाधित आढळली असून यापैकी 69 जनावरे उपचारानंतर बरी झाली असून सध्या 69 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

तालुक्यात आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला असून तालुक्यातील भायगाव व दहीगाव येथे प्रत्येकी दोन तर मजलेशहर येथे एक अशा एकूण पाच जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आली. लम्पी सदृश आजाराच्या प्रादुर्भावासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीचे लसीकरण व बाधित जनावरांना उपचाराची मोफत व्यवस्था असून शेतकरी पशुपालकांनी लसीकरण व बाधित जनावरांच्या उपचारासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधितांशी संपर्क साधण्याचे आवाहन गटविकास अधिकारी महेश डोके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.असलकर यांनी केले आहे. शेवगाव तालुक्यात जनावरांच्या लम्पी सदृश आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे डॉ.असलकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या