शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव शहरात पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा, स्वच्छता अशा सार्वजनिक नागरीक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून नगरपरिषदेच्या या ढिसाळ कारभाराने नागरिक संतप्त झाले आहेत.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कचरा संकलन करणार्या घंटागाड्या येत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे नागरिक, महिलांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे. अनेक भागात रोगराई वाढल्याच्या तक्रारी असून लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील विविध भागात बारा ते पंधरा दिवसांनी फक्त एकदा व तोही अत्यंत कमी प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. दूषित पाण्याने विविध आजारांची साथ पसरली असून अनेकांना विविध आजारांची लागण झाल्याने दवाखान्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विविध भागात उघड्यावरील गटारी व नाल्यांची वेळेवर सफाई होत नसल्याचे नागरिकांतून तक्रारी आहेत. तुंबलेल्या गटारींमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. विविध भागात सार्वजनिक मुतारी व शौचालयाचा असलेला अभाव, अनेक ठिकाणी पथ दिवे बंद असल्याने या भागात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.
नगरपरिषदेसह सर्व संबंधित विभागाचे याबाबत दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात सार्वजनिक सुविधांचा बोजवारा उडाल्याच्या जनतेतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधितांनी तातडीने पावले उचलावीत अन्यथा अंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
खंडित वीजपुरवठ्याने हैराण
शहरात दिवस दिवस वीज पुरवठा गायब राहत असल्याने छोटे-मोठे उद्योग करणारे व्यावसायिक तसेच सध्या विविध शासकीय व निम शासकीय कार्यालयांतून सुरू असलेली ऑनलाईन पद्धतीची कामे रेंगाळली आहेत. सर्वसामान्य नागरिकांची विविध कार्यालयांत वारंवार चकरा मारून दमछाक होत असल्याच्या तक्रारी आहेत.