Thursday, October 17, 2024
Homeनगरजिल्ह्यात सर्वाधिक शेवगाव-पाथर्डीत तीन लाख 72 हजार मतदार

जिल्ह्यात सर्वाधिक शेवगाव-पाथर्डीत तीन लाख 72 हजार मतदार

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या संख्येत सुमारे 10 हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून आता मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या तीन लाख 72 हजार 476 झाली आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या विचारात घेता सर्वात जास्त मतदार शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात असल्याचेही प्रांताधिकारी मते यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील आठ मंडळांतील 113 तसेच पाथर्डी तालुक्यातील सहा मंडळांतील 101 महसुली गावांचा समावेश असून एकूण मतदार संख्या तीन लाख 72 हजार 476 असून त्यात एक लाख 93 हजार 876 पुरूष तसेच एक लाख 78 हजार 594 महिला व सहा इतर मतदारांचा समावेश आहे. युवक मतदारांची संख्या आठ हजार 183 तर दिव्यांग मतदारांची संख्या दोन हजार 464 असून 85 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या सात हजार 129 असून सेवा दलामध्ये 102 कार्यरत मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी एकूण 365 मतदान केंद्र होती एका मतदान केंद्रामध्ये 1500 मतदारांचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने ठेवला असून विधानसभेसाठी नव्याने तीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून सद्यस्थितीत एकूण मतदान केंद्राची संख्या 368 झाली आहे.

शेवगाव शहरासाठी मतदान केंद्र क्रमांक 76 व 91 तसेच पाथर्डी शहरासाठी मतदान केंद्र क्रमांक 246 नव्याने स्थापित करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत. विधानसभा मतदारसंघात एकूण 35 क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह मतदान अधिकारी सहाय्यक मतदानाधिकारी शिपाई वर राखीव अशा एकूण 2500 अधिकारी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्यादृष्टीने तालुक्यातील कर्‍हे टाकळी व पाथर्डी तालुक्यातील मीठ सांगवी व चितळवाडी अशा तीन ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक तसेच सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तीन व्हिडिओ सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त करण्यात आलेले मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण 26 ऑक्टोबर व 8 नोव्हेंबर रोजी शेवगाव शहरातील नेवासा रस्त्यावरील त्रिमूर्ती विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. प्रचार सभा परवानगीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज प्रथम येणार्‍या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. वाहन परवाना बॅनर्स पोस्टर्स इत्यादी सर्व प्रकारच्या परवानगी या एक खिडकी मार्फत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक, शेवगावचे निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक बर्डे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या