Saturday, May 25, 2024
Homeनगरशेवगाव-पाथर्डीत भाजप अंतर्गत वाद उफाळला

शेवगाव-पाथर्डीत भाजप अंतर्गत वाद उफाळला

बोधेगाव | Bodhegav

भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी नुकतीच दक्षिणेची जम्बो कार्यकारिणी घोषित केली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदासंघात सर्व गटतट बाजुला ठेवून सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर केली मात्र, या घोषणेनंतर लागलीच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्या गटाविरुद्ध आ. मोनिका राजळे गट अशी मतदारसंघात भाजपअंतर्गत मोठी दुफळी जाहीरपणे समोर आली आहे. यात मुंडे समर्थक नूतन पदाधिकार्‍यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे देण्याची धमकी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भेट घेऊन दिली आहे.

- Advertisement -

भाजपा जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी जाहीर केलेल्या पाथर्डी-शेवगाव पदाधिकार्‍यांमध्ये मुंडे गटाला मानणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांची वर्णी लागली. त्यामुळे आ. राजळे गटाचे कार्यकर्ते नाराज होत त्यांनी तातडीने पक्षाकडे दबाव वाढवल्याने आ. मोनिका राजळे यांनी नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता निवड होऊन स्थगिती आलेले मुंडे समर्थक पदाधिकारी आक्रमक होऊन पक्षाचे प्रामाणिकपणे काम करुनही अन्याय होत असल्यानं धास्तावले आहेत. त्यांनी जाहीरपणे आ. राजळे यांच्या हस्तक्षेपाला उघड आव्हान दिले आहे. आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी अध्यक्ष तुषार वैद्य, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कोळगे, गणेश कराड, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड आदींनी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांची भेट घेतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. निवडलेले पदाधिकारी हे 25-30 वर्षे पक्षासाठी काम केलेले मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या वाईट काळात त्यांनी पक्ष मतदारसंघात टिकवून ठेवला आहे. त्यामुळे आता निवडलेले पदाधिकारी बदल केल्यास त्याचे दुष्परिणाम भविष्यात निवडणुकांत उमटू शकतात, असा इशारा निष्ठावंतांनी दिला असल्याने आ. मोनिका राजळे यांच्यासमोर दोन्ही गटांची नाराजी दूर करणे भविष्यात मोठे आव्हान असणार आहे.

आ. मोनिका राजळे यांना भाजपाची प्रथम उमेदवारी पंकजा मुंडे यांच्यामुळे मिळाली हे सर्वश्रुत आहे. राजळे यांना पक्षात मोठा विरोध झाला होता. नाराज गटाची ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी मनधरणी करून आ. राजळे यांना मोठी मदत केली. परंतु आ. राजळेंकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष, संघटना, स्थानिक निवडणुकीत सातत्यानं बाजुला सारण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

– बाळासाहेब सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या