शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरण्याची तयारी आ. मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्यासह अन्य पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली आहे. ऐन दिवाळीत होणार्या या निवडणुकीसाठी आतापासून या सर्वांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. यामुळे यंदा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चुरसपूर्ण बहुरंगी सामना होणार आहे. तसेच कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात वारे फिरणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
माजी आ. घुले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून तर पवार गटाचे अॅड. ढाकणे यांनी शिवारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाड्या वस्त्यांवर नागरिकांच्या समस्यांमध्ये रस दाखवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघ अन्या तालुक्याच्या तुलनेत मागे फेकला गेल्याची खंत घुले- ढाकणे करत असून येत्या निवडणुकीत जनतेने परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत आहेत. निवडणुकीसाठी घुले कुटुंब पायाला भिंगरी लावून जनतेशी संवाद साधताना दिसत आहे. तसेच नव्या-जुन्या समर्थकांसह विरोधी गोटातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विधानसभेत तालुक्याचा हक्काचा लोकप्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. अॅड. ढाकणे यांनीही शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात शरद पवारांची राष्ट्रवादी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
खा. निलेश लंके यांच्या समर्थकांची ही त्यांना मोलाची साथ मिळताना दिसत आहे. या मतदारसंघाचे घुले यांनी एकदा प्रतिनिधित्व केले असल्याने कोणता कायकर्ता कसे कर्तृत्व दाखवू शकतो, याचा अंदाज त्यांना आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यात दुफळी निर्माण झाल्यानंतर घुले बंधूंनी राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र, ऐनवेळी ते उमेदवारी करणार की भाजप उमेदवाराची तळी उचलणार यावर तालुक्यात खल सुरू आहे. घुले कुटुंबाचे जिल्ह्यातील सर्व बड्या राजकीय कुटुंबाशी सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना कोणा कोणाची कशीकशी मदत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विद्यमान आ. राजळे यांचाही मतदारसंघात विकास कामांचा झंजावात सुरू ठेवला आहे. विधानसभेच्या राजकीय भूमिकेबद्दल विचारणा केली असता त्यांनी थांबा आणि वाट पहा अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
थोडे थांबा राजळे यांचा राजकीय करिष्मा दिसून येईल, असा विश्वास त्यांचे समर्थक बोलून दाखवत आहेत. तर आ. राजळे देखील दहा वर्षांत मतदारसंघातील कोणत्या गावातून किती मते मिळाली, याचा हिशोब न मांडता मागणीनुसार कामे मंजूर करत जास्तीजास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा राजळेताई हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होत आहे. मतदारसंघातील भाजपची सर्व सूत्रे राजळे यांच्या हाती असली तरीही राजळे आणि विखे असे दोन गट स्वतंत्रपणे मतदारसंघात कार्यरत आहेत. विखे यांचा गट राजळेपेक्षा तुलनेने कमी असला तरी त्यांना यंत्रणेत सामील करून घेण्याची मोहीम राजळे यांना राबवावी लागणार आहे.
तसेच विखे समर्थक अद्याप लोकसभेच्या पराभवातून सावरलेली दिसत नाही. यामुळे राजळे यांना नाराज असणार्या विखे समर्थकांची मोट बांधून त्यांना सोबत घ्यावे लागणार आहे. सध्या मतदारसंघात माझी बहिण लाडकी योजनेचे अर्ज भरून घेण्यात आ. राजळे आणि त्यांचे समर्थक व्यस्त दिसत आहेत. यामुळे शेवगाव-पाथर्डी कोणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात वारे फिरणार यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.